अपघातांच्या पाश्र्वभूमीवर ‘प्लांट अ‍ॅण्ड वेल्फेअर’ सोसायटीचा पुढाकार

भटक्या श्वानांमुळे महामार्गावरील होणारे अपघात कमी करण्यासाठी शहरातील श्वानांच्या गळ्यात आता मॅजिक कॉलरचा पट्टा लावण्यात येणार आहे. रात्री महामार्गावरील श्वान न दिसल्यामुळे आणि अचानक समोर येणाऱ्या श्वानाला वाचविण्यासाठी वेग आवरणे कठीण झाल्यामुळे अपघात होतात. यात अनेक श्वानांचा मृत्यू होतो. या श्वानांचे संरक्षण करण्यासाठी मुंबईतील प्राणीमित्र संस्थेने श्वानांच्या मानेवर रेडीअम लावलेला मॅजिक पट्टा बांधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

मुंबईतील पॉझ (प्लांट अ‍ॅण्ड वेल्फेअर सोसायटी) या संस्थेने रेडीअम लावलेल्या पट्टय़ांची निर्मिती केली असून ऑगस्ट महिन्यापासून नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, विरार आणि मुंबईतील काही भागातील १५० श्वानांच्या मानेला मॅजिक कॉलरचा पट्टा लावण्यात आला आहे. एका महिन्यात सुमारे १५ ते २० श्वान रस्ते अपघातात परळच्या बाई साखराबाई दिनशॉ पेटीट रूग्णालयात दाखल होतात, तर पावसाळ्यात या अपघातांची संख्या वाढून २५ पर्यंत जाते असे या रूग्णालयाचे प्रमुख डॉ.के.सी.खन्ना यांनी सांगितले. या अपघातात श्वानांबरोबरच माणसेही जखमी होतात. रात्रीच्यावेळी रस्त्यावर श्वान फिरत असतात, अशावेळी वेगाने येणारी वाहने श्वानांना धक्का देऊन निघुन जातात. तातडीचे उपचार मिळत नसल्यामुळे रक्तस्त्राव झाल्यामुळे हे श्वान जागीच मरण पावतात. तर दुसरीकडे काही वाहन चालक श्वानांना वाचविण्यासाठी वेगात असलेली गाडी थांबविण्याचा प्रयत्न करतात, यामध्ये वाहन घसरून अपघात होतात. हे रोखण्यासाठी मुंबईतील महामार्गावरील भटक्या श्वानांना वाचविण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी श्वानांना रेडिअमचा पट्टा बांधण्याची संकल्पना पुढे आली. सहा महिन्यांपूर्वी पुण्यातील आय.आय.टी महाविद्यालयातील एक विद्यार्थ्यांने श्वानांचे रस्ते अपघात रोखण्यासाठी मॅजिक कॉलरची आखणी केली. त्यावेळी रतन टाटा यांची संस्था या प्रकल्पाला आर्थिक मदत केली होती.

मॉजिक कॉलर हा उपक्रम महामार्गावरील श्वानांसाठी आहे. महामार्गावरील अपघातासांठी भटक्या श्वानांना बोल लावले जाते. त्यामुळे अपघात प्रवण क्षेत्रातील भटक्या श्वानांसाठी या पट्टय़ाची निर्मिती करण्यात आली आहे. या पट्टय़ामुळे एक किलोमीटर अंतरावरील वाहनाला इशारा देता येईल. प्राणीमित्रांनी आपल्या भागातील श्वानांना हा पट्टा पोहचविण्यासाठी पॉझशी संपर्क करावा. संपर्क – ९८२०१६१११४ -निलेश भणगे, पॉझचे संस्थापक