राफेल लढाऊ विमान व्यवहारावरुन सुरू झालेला वाद दिवसेंदिवस चिघळत असल्याचे दिसत आहे. काँग्रेस-भाजपाकडून एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनीही उडी घेतली आहे. राफेलच्या किंमती जाहीर करण्यास कोणताच धोका नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. बोफोर्स तोफांवेळी काँग्रेसवर आरोप झाल्यानंतर भाजपाने हीच मागणी केली होती. सुषमा स्वराज यांनी कोणत्याही परिस्थितीत बोफोर्स संबंधीची माहिती जाहीर झालीच पाहिजे, अशी भूमिका घेतली होती, अशी माहिती पवार यांनी माध्यमांना दिली. संरक्षणासंबंधीची गोपनीय माहिती जाहीर केल्यास देशाच्या सुरक्षिततेला धोका पोहोचेल असा युक्तीवाद भाजपाकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी हे महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे.

‘एएनआय’शी बोलताना पवार म्हणाले, माझ्या मते राफेलच्या किंमती जाहीर केल्यामुळे देशाच्या संरक्षण गोपनीयतेला कोणताच धोका निर्माण होणार नाही. जेव्हा मी यूपीए सरकारच्या काळात संसदेत होतो. तेव्हा भाजपाने बोफोर्सचा मुद्दा उपस्थित केला होता. सुषमा स्वराज यांनी तर बोफोर्स संबंधीची सर्व माहिती जाहीर करण्याची आग्रही मागणी केली होती.

राफेल विमानाच्या किंमती आणि इतर दस्तावेजाची माहिती जाहीर केल्यास देशाच्या सुरक्षिततेला धोका पोहोचेन असा दावा भाजपाकडून वारंवार केला जातो. तो दावा खोडत शरद पवारांनी बोफोर्सबाबत भाजपाची भूमिका काय होती याची माहिती माध्यमांना दिली.