कुर्ल्यामध्ये गेल्या दहा दिवसांत तब्बल २१ मंगल कार्यालयांवर छापे घालण्यात आले. त्यापैकी दोन सभागृहांना कारणे दाखवा नोटिसा पाठवतानाच, बाकीच्या ठिकाणी लग्न कार्यालयात सहभागी असलेल्या लोकांना दंड आकारण्यात आला आहे.

मुंबईत करोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांना मुखपट्टीचा वापर बंधनकारक केला. मुखपट्टीविना फिरणाऱ्यांविरुद्ध पालिके ने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. तसेच नाइट क्लब, मंगल कार्यालये, उपाहारगृहे येथेही छापे घालून सार्वजनिक आयोजनाचे कार्यक्रम करताना नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी १८ फेब्रुवारीला दिले होते. लग्न सभारंभात नियमभंग केल्यास सभागृह व्यवस्थापकाविरोधात व पालकांविरोधात, व्यवस्थापनांवर गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाचाही समावेश होता.

झाले काय?

* कुर्ला परिसरात रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे एल विभागाने लग्न समारंभांवर छापे घालून तपासणी करण्याची कारवाई केली. गेल्या दहा दिवसांत तब्बल २१ मंगल कार्यालयांवर अशाप्रकारे छापे घालण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

* सध्या लग्न सभारंभांना केवळ ५० लोकांनाच परवानगी आहे, तसेच सगळ्यांनी मुखपट्टय़ा लावणे बंधनकारक आहे. मात्र एल विभागाने केलेल्या कारवाईत काही सभागृहांमध्ये ५० पेक्षा जास्त लोक सहभागी झाल्याचे आढळले होते.

* तसेच अनेकांनी मुखपट्टय़ा लावल्या नव्हत्या. यापैकी काही सभागृहांमध्ये सहभागी लोकांवर २०० रुपये दंडात्मक कारवाई कारवाई करण्यात आली. तर दोन सभागृहांना कारणे दाखवा नोटीस धाडण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.