05 March 2021

News Flash

रेल्वेमार्गावरील अपघाती मृत्यूच्या प्रमाणात घट

पहिल्या तीन महिन्यांमध्ये ६६४ जणांचा जीव गेला असून ८०६ जण जखमी झाले आहेत.

मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमार्गावर अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची दर दिवशीची सरासरी संख्या गेल्या वर्षी दहा एवढी होती

तीन महिन्यांत ६६४ जणांचा मृत्यू; ८०६ जण जखमी; अपघाती मृत्यूची दर दिवसाची सरासरी दहावरून सातवर

डोंबिवलीच्या भावेश नकाते अपघाती मृत्यू प्रकरणानंतर मध्य तसेच पश्चिम रेल्वेने केलेल्या उपाययोजनांना फळे येऊ लागली आहेत. मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमार्गावर अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची दर दिवशीची सरासरी संख्या गेल्या वर्षी दहा एवढी होती. आता यात लक्षणीय घट झाली असून नव्या वर्षांच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये हा आकडा सात एवढा आहे. पहिल्या तीन महिन्यांमध्ये ६६४ जणांचा जीव गेला असून ८०६ जण जखमी झाले आहेत.

उपनगरीय रेल्वेमार्गावरील अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दर वर्षी साडेतीन हजारांच्या आसपास असल्याने या अपघाती मृत्यूंबद्दल वारंवार चिंता व्यक्त करण्यात येत होती. त्यातच गेल्या वर्षी जानेवारी महिन्याच्या सुमारास धावत्या गाडीतील गर्दीमुळे डोंबिवली येथील भावेश नकाते या तरुणाचा गाडीतून पडून मृत्यू झाला होता. या घटनेची गांभीर्याने दखल घेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी खासदार आणि रेल्वे अधिकारी यांची समिती स्थापन करून हे अपघाती मृत्यू रोखण्यासाठीच्या उपाययोजना सुचवण्यास सांगितल्या होत्या.

table01त्यानंतर रेल्वेने या अपघातांना आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलीस यांच्या साहाय्याने विविध मोहिमा राबवल्या. त्याच बरोबरीने दोन स्थानकांमध्ये पादचारी पूल, स्थानकातील पादचारी पूल, सरकते जिने, उद्वाहक आदी सुविधा पुरवत प्रवाशांनी रूळ ओलांडू नयेत, याचीही दखल घेण्यात आली. गर्दी कमी करण्यासाठी हार्बर मार्गावर जादा फेऱ्या, पश्चिम रेल्वेवरील फेऱ्यांच्या संख्येत वाढ अशा योजना करण्यात आल्या आहेत.

या सर्वाचा परिणाम नव्या वर्षांच्या पहिल्या महिन्यापासूनच दिसायला लागला असून पहिल्या तिमाहीत ८९ दिवसांमध्ये ६६४ जणांचा मृत्यू रेल्वे अपघातांमध्ये झाला. म्हणजेच दर दिवशी सरासरी ७ जण या अपघातांमध्ये मृत्युमुखी पडले. तसेच जखमींची संख्याही सरासरी आठ एवढी असून या कालावधीत ८०६ जण जखमी झाले आहेत.

अपघाती मृत्यू कमी होण्याची कारणे

’ रूळ ओलांडणाऱ्यांना रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाची  विशेष मोहीम. रूळ ओलांडणाऱ्यांना गुलाबाचे फूल देऊन धोक्याची सूचना.

’ मध्य तसेच पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाची लोकलच्या दरवाज्यांमध्ये उभ्या राहणाऱ्या टोळक्यांवर कारवाई.

’ पादचारी पूल आणि सरकते जिने वाढवण्यात आल्याने रूळ ओलांडणाऱ्यांच्या प्रमाणात घट.

’ रूळ ओलांडण्याबाबत संवेदनशील असलेल्या स्थानकांदरम्यान मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाचा पहारा.

’ प्लॅटफॉर्म आणि गाडी यांच्यातील पोकळी कमी करण्यात यश.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 3:54 am

Web Title: rail crossing accidents decline on suburban railway route
Next Stories
1 घोडागाडीची सफर नकोच!
2 ‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये बक्षिसांची लूट
3 शहरबात : आकडय़ांच्या खेळात, बाकी शून्य!
Just Now!
X