रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे महाराष्ट्राचे असल्याने अर्थसंकल्पात राज्याला काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. गतवर्षांच्या तुलनेत एकूण तरतुदीमध्ये दहा टक्के वाढ करण्यात आली असून, राज्यातील वर्षांनुवर्षे रखडलेल्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न झाला आहे. याशिवाय केंद्र व राज्य भागीदारीतून सर्वाधिक प्रकल्प महाराष्ट्राच्या वाटय़ाला आले आहेत. सत्ताधारी भाजपने या अर्थसंकल्पाचे स्वागत केले असले तरी विरोधकांनी टीका केली आहे.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुंबईतील दोन उन्नत मार्ग तसेच सर्व फलाटांची उंची वाढविण्याची तरतूद करून रेल्वे प्रवाशांना आपलेसे करण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. राज्यातील प्रकल्पांकरिता ४७६७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. चालू वर्षांत ही तरतूद ४४५८ कोटी रुपये होती.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज मांडलेला रेल्वे अर्थसंकल्प विकासाच्या वाटा अधिक विस्तारित करणारा, सर्वसामान्यांवर कुठलाही बोजा न टाकता त्यांचा प्रवास अधिक सुखकर करणारा आहे. महाराष्ट्र आणि मुंबईकर म्हणून त्यांनी राज्यालाही भरभरून दिले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.हा रेल्वे अर्थसंकल्प ‘अ‍ॅडव्हाण्टेज महाराष्ट्र’ असून, विकासाचा एक नवा प्रवाह रूजविण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून झाला आहे. रेल्वेच्या पायाभूत विकासात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा मनोदय व्यक्त करून रेल्वेमंत्र्यांनी विकासाच्या कक्षा आणखी रूंदावल्या आहेत. ही घोषणा निश्चितपणे विकासाचे इंजिन म्हणून कार्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Untitled-40