तुटलेले चाक अवघ्या तीन महिन्यांपूर्वीचे
पश्चिम रेल्वेवर गाडी रुळावरून घसरून झालेल्या अपघातात एका डब्याचे चाक तुटलेले आढळल्याने रेल्वे प्रशासन पातळीवर खळबळ उडाली आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तुटलेले चाक (अ‍ॅक्सेल) या डब्याला तीन महिन्यांपूर्वीच नवीन बसवले होते. त्यानंतर त्याची चाचणीही झाली होती. तरीही केवळ तीन महिन्यांतच ते तुटल्याने रेल्वे प्रशासन हैराण झाले आहे. तुटलेले चाक हेच अपघाताचे कारण आहे किंवा नाही, याची चौकशी सुरू असली तरी या चाकामुळे रेल्वेमधील साधनसामग्रीच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पश्चिम रेल्वेवर अंधेरी-विलेपार्ले या स्थानकांदरम्यान घसरलेली ही गाडी ‘४०००’ मालिकेतील होती. याच मालिकेतील गाडी चर्चगेट स्थानकात प्लॅटफॉर्मची हद्द ओलांडून थेट प्लॅटफॉर्मवर चढली होती. त्या प्रकरणात मोटरमनची चूक असली तरी याप्रकरणी प्राथमिक निष्कर्षांनुसार गाडीचे चाक मोडल्यानेच अपघात झाल्याचे दिसत आहे. तुटलेले चाक हे त्या डब्याला २६ जून २०१५ रोजी बसवले होते. या चाकाची अत्युच्च क्षमता चाचणीही त्याच महिन्यात २९ जून रोजी झाली होती. त्यानंतरच हे चाक आणि तो डबा प्रवाशांच्या सेवेत आला होता, अशी माहिती नाव जाहीर न करण्याच्या अटीवर पश्चिम रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

गाडीचे चाक अत्यंत कठीण धातूपासून तयार होते. ते सहजासहजी तुटत नाही. आतापर्यंत भारतीय रेल्वेच्या इतिहासात चाक तुटल्याने अपघात होण्याच्या घटना अत्यंत दुर्मीळ आहेत. पश्चिम रेल्वेवरील अपघात चाक तुटल्यामुळेच झाला असेल, तर ती खूपच गंभीर बाब आहे. यामुळे रेल्वेत वापरल्या जाणाऱ्या साधनसामग्रीच्या दर्जाबद्दल प्रश्न निर्माण होणार आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
काही महिन्यांपूर्वी मध्य रेल्वेवर कल्याण येथे रूळ तुटल्याने एका लांब पल्ल्याच्या गाडीचे डबे घसरले होते. त्या वेळी रुळाचा तुकडा ज्या प्रकारे तुटला होता तसा आधी तुटला नव्हता. त्या वेळीही रुळांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. हा साधनसामग्रीतील दोष असेल तर त्याचा फटका देशभरात बसू शकतो, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.