सरासरी वक्तशीरपणात वर्षभरात ६ टक्क्य़ांनी घसरण; तांत्रिक बिघाडामुळे प्रवासी हैराण

गेल्या दोन वर्षांत अनेक बिघाड होऊनही मध्य रेल्वेने वक्तशीरपणा कसोशीने पाळण्याचा प्रयत्न केला असला तरी नववर्षांतील गेल्या पाचच दिवसांत मध्य रेल्वेचा वक्तशीरपणा चांगलाच घसरला आहे. दररोज सरासरी ८८ टक्क्यांहून अधिक असणारा वक्तशीरपणा घरसरत पाच दिवसांत थेट ८२ टक्क्यांवर आला. त्यामुळे नव्या वर्षांतही मध्य रेल्वेवरील लोकल वेळेवर धावणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पाच दिवसांतच मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर मोठय़ा प्रमाणात तांत्रिक बिघाडांचा सामना मध्य रेल्वेला करावा लागला. यात ट्रेनमधील बिघाड तीनपेक्षा अधिक, रुळाला तडा चारहून अधिक घटना तर सिग्नलमधील बिघाड जवळपास २५ पेक्षा जास्त घडल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांकडून देण्यात आली.

मध्य रेल्वे मार्गावर अनेक तांत्रिक बिघाड होत असल्याने लोकल वेळेवर धावत नाहीत आणि त्याचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळेच लोकल वेळेवर धावू शकल्या नाहीत. मात्र नव्या वर्षांत लोकल वेळेवर धावतील, या दृष्टीने आमच्याकडून नियोजनही केले जात असल्याचे सांगण्यात आले.

वर्षभरातील तांत्रिक बिघाडाच्या घटना

* २०१६-१७ (२०१६ एप्रिल ते डिसेंबर)मध्ये जवळपास १५०० विविध तांत्रिक बिघाड झाले.

* यामध्ये सर्वाधिक बिघाड लोकल व इंजिनातील असतानाच त्यानंतर सिग्नल, ओव्हरहेड वायर आणि रुळांना तडा गेल्याचे आहेत.

* २०१५-१६ मध्ये १ हजार १७० तांत्रिक बिघाड झाले आहेत. या बिघाडानंतरही २०१६ मध्ये लोकलचा वक्तशीरपणा ८८ टक्क्यांपर्यंत राहिला. २०१५ मध्ये ८६ टक्के एवढा वक्तशीरपणा होता.

* २०१६ डिसेंबर महिन्यात तांत्रिक बिघाडांचा सामना करूनही ८८.८८ टक्केपर्यंत वक्तशीरपणा गेला. नव्या वर्षांत तरी यात सुधारणा होऊन लोकल वेळेवर धावतील, अशी अपेक्षा होती. पण अपेक्षाभंगच झाल्याचे दिसून आले. २०१७ मधील पहिल्या पाच दिवसांचा मिळून लोकलचा वक्तशीरपणा हा ८२.३ टक्क्यांपर्यंत राहिला.