उपनगरीय रेल्वेमार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीने आता प्रवाशांच्या सूचना मागवण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीत प्रवासी प्रतिनिधींना दिलेल्या सहभागाबद्दल प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. त्या पाश्र्वभूमीवर या समितीने हा निर्णय घेतला आहे.
उपनगरीय मार्गावर गर्दीत लटकत प्रवास करणाऱ्यांपकी सरासरी ५०० प्रवाशांचा मृत्यू गाडीतून पडून होत असल्याची नोंद आहे. तसेच तब्बल १२०० लोक रेल्वेरूळ ओलांडताना बळी पडतात. त्याशिवाय इतर अनेक गोष्टींमुळे प्रवासी बळी पडतात. उपनगरीय रेल्वेमार्गावरील विविध प्रवासी संघटनांनी स्वत:चा अभ्यास करून हे अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुचवल्या आहेत. त्याबाबतची परिपत्रके या संघटनांनी वेळोवेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांपासून विविध रेल्वे अधिकाऱ्यांना दिली आहेत.
‘भावेश नकाते’ प्रकरणानंतर रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेवर नऊ सदस्यीय समिती स्थापन केली. या समितीमध्ये प्रवासी प्रतिनिधी म्हणून सहभाग असलेल्या सदस्यांच्या नावाला विविध प्रवासी संघटनांचा विरोध आहे. हे समिती सदस्य नियमाने प्रवास करणारे नाहीत. त्यामुळे त्यांना प्रवाशांच्या समस्यांची जाणीवच नाही, असे आरोप या प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी केले आहेत. या आरोपांची दखल घेत आणि प्रवाशांच्या सूचनांचाही अंतर्भाव करून घेण्यासाठी आता मध्य रेल्वेने प्रवाशांना सूचना करण्याचे आवाहन केले आहे.
मध्य रेल्वेने http://www.cr.indianrailways.gov.in या रेल्वेच्या संकेतस्थळावर सूचना मागवण्याचे आवाहन केले आहे. या संकेतस्थळावर गेल्यावर तेथे दिलेल्या लिंकवर प्रवाशांनी सूचना करायच्या आहेत. त्याचप्रमाणे suburbansuggestions@gmail.com या ई-मेल आयडीवरही प्रवाशांच्या सूचनाही मागवल्या आहेत. सूचना करण्यासाठी २१ डिसेंबर ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. या सूचनांपकी व्यवहार्य सूचनांचा विचार समिती करणार आहे. या समितीचा अहवाल ३१ डिसेंबपर्यंत रेल्वे मंत्रालयाला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर रेल्वे मंत्रालय अपघात रोखण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याची शक्यता आहे.