दरवर्षीप्रमाणे यंदा गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेने सोडलेल्या विशेष गाडय़ांचे आरक्षण काही मिनिटांतच फुल्ल झाले आहे. गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी, म्हणजे १५ सप्टेंबरला सुटणाऱ्या सीएसटी-मडगाव आणि दादर-सावंतवाडी या विशेष गाडय़ांचे आरक्षण शुक्रवारी सुरू होताच पाच मिनिटांत फुल्ल झाले आणि प्रतीक्षा यादीही ४००वर गेली.
१७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वेने आतापर्यंत ६० विशेष गाडय़ांची घोषणा केली होती. १० सप्टेंबरपासून सुटणाऱ्या या गाडय़ांचे आरक्षण १२ जुलैपासून सुरू झाले होते. मात्र गणेशोत्सवाच्या एक आठवडा आधीपासून जाणाऱ्या या गाडय़ांना प्रवाशांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही. पण १७ सप्टेंबरच्या गणेश चतुर्थीसाठी १५ किंवा १६ सप्टेंबपर्यंत घरी पोहोचणाऱ्या चाकरमान्यांनी शुक्रवारच्या तिकीट आरक्षणावर नजर ठेवली होती.
हे आरक्षण सकाळी सुरू झाल्यानंतर अक्षरश: तीन-चार मिनिटांतच फुल्ल झाले.