संपूर्ण मोसमात राज्याकडे दुर्लक्ष केलेल्या पावसाने माघारीच्या प्रवासात मुक्काम केला आहे. नेहमीच्या वेळेआधी तीन आठवडे माघारीचा प्रवास सुरू केलेल्या मान्सूनचा उत्तर व मध्य भारतातील प्रभाव अत्यंत क्षीण झालेला आहे; मात्र बंगालच्या उपसागराच्या कृपेने राज्यात पावसाळी ढगांनी पुनरागमन केले आहे. सोमवारपासून सर्वच भागात पाऊस सुरू होण्याचा अंदाज केंद्रीय वेधशाळेने व्यक्त केला आहे.

मान्सूनने सप्टेंबरच्या पहिल्याच आठवडय़ात माघार घेण्यास सुरुवात केल्याने, पावसाचे तीन महिने कोरडे गेलेल्या महाराष्ट्राच्या तोंडचे पाणी पळाले. मात्र दरवेळी अरबी समुद्रावरील पश्चिमी वाऱ्यांकडून पाऊस मिळणाऱ्या राज्याला यावेळी बंगालच्या उपसागरावरून येत असलेल्या पूर्वेकडील वाऱ्यांनी साथ दिली आहे.
पूर्वेकडून भरपूर ढग घेऊन येणाऱ्या पावसाची कृपा होणार असल्याचा अंदाज आहे. त्यातही कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भातही पावसाच्या सरी येतील. अवघा ५० टक्केही पाऊस न झालेल्या मराठवाडय़ातही पावसाच्या सरी येतील. पुढील आठवडाभर पावसाळी वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. ईशान्य आणि दक्षिण भारताची साथ पावसाने सोडलेली नसली, तरी उत्तरेतील बहुतांश भागातून पावसाने पाय काढता घेतला आहे. त्यामुळे देशपातळीवरील मान्सूनची तूट १६ टक्क्य़ांवर गेली आहे.