पुढील पाच दिवसात राज्यात, विशेषत: विदर्भात गडगडाटासह वादळी पाऊस आणि गारा पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या सात दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात आली आहे.

उत्तरेकडून येणारे थंड आणि उष्ण वारे व बंगालच्या उपसागरावरून येणारे थंड आणि दमट वारे यांच्यामुळे वादळी पावसाची शक्यता निर्माण झाल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. उन्हाळ्याच्या तोंडावर अशी परिस्थिती निर्माण होत असते असे ते म्हणाले. पुढील पाच दिवसात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. चौथ्या आणि पाचव्या दिवशी विदर्भात काही ठिकाणी गारा पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजा चमकून पाऊस पडू शकतो.

तापमानात वाढ..

गेल्या आठ दिवसात राज्यात अनेक ठिकाणी कमाल आणि किमान दोन्ही तापमानात वाढ दिसून आली. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी पारा ४० अंशापर्यंत पोहचला होता. तर बहुतांश ठिकाणी किमान तापमान २० अंश सेल्सिअसच्या वरच राहिले. मुंबईचे किमान तापमान २५ अंश, तर कमाल तापमान ३५ पर्यंत पोहचले.