मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा व्यंगचित्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह वर्गाबाहेरचे विद्यार्थी असल्याचा टोला लगावला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवसीय व्याख्यानमाला कार्यक्रम ‘भविष्यातील भारत’च्या निमित्ताने राज ठाकरे यांनी ही टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी व्यंगचित्रात नरेंद्र मोदी आणि अमित शाह व्यवस्थेला चिरडत असल्याचं दाखवलं आहे. त्याचवेळी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत एक स्वयंसेवक संवाद साधताना दाखवण्यात आलं आहे.

सरसंघचालक मोहन भागवत स्वयंसेवकाला सांगत आहेत की, ‘आरएसएस ही एक लोकशाहीप्रधान संघटना आहे ! संघात कोणा एकाची मनमानी चालत नाही. संघ विचारांवर अंकुश ठेवत नाही. संघात विविध स्तरांवर विचारांचे आदानप्रदान, चर्चा केली जाते’.

यावेळी स्वयंसेवकाच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना टोला मारला आहे. ‘मोहनजी अगदी बरोबर सांगत आहात ! आपण म्हणताय तेच आजपर्यंत आम्हाला ‘शिकवलं’ गेलं. मग या दोघांना नाही का ते ‘शिकवलं’ गेलं’, असा प्रश्न स्वयंसेवक मोहन भागवत यांना विचारताना दाखवण्यात आलं आहे.

याआधी राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून नरेंद्र मोदी स्वत:च्याच प्रतिमेच्या प्रेमात पडलेला प्रसिद्धी विनायक आहे अशा शब्दांत टोला लगावला होता. यासाठी त्यांनी राज्य सरकारने नुकताच काढलेल्या आदेशाचा दाखला दिला होता. सर्व शाळांमध्ये मुलांना नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर आधारित ”चलो जीते है” हा लघुपट दाखवण्याची सक्ती केली होती. तसेच सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवाचा दाखला देत राज ठाकरे यांनी मोदींना ओरखडे ओढले होते.