विकास प्रकल्पांच्या नावाखाली मुंबईतील मराठी माणसावर होत असलेला अन्याय खपवून घेतला जाणार नाही. या प्रकल्पांच्या नावाखाली मुंबई वेगळी करण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी केला. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने आखलेले प्रकल्प पुढे न्यायचे असतील, तर तुम्ही सत्तेवर कशाला हवेत. त्यांनाच सत्तेवर बसवा, असा टोला त्यांनी राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारला मारला.
मुंबईतील मेट्रो-३ प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱया दादरमधील नागरिकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी मराठी माणसाच्या मुळावर येणाऱया प्रकल्पांना आमच विरोध राहील, असे स्पष्ट केले. ते म्हणाले, गिरगाव, दादर यासारख्या मराठी लोकवस्ती असलेल्या भागामध्येच हे प्रकल्प उभे केले जात आहेत. बाहेरून आलेल्या लोकांच्या सुखासाठी हे प्रकल्प केले जात आहेत. मराठी माणसांनी या प्रकल्पांची मागणी कधीच केली नव्हती. कोस्टल रोड, मेट्रो या प्रकल्पांच्या माध्यमातून मराठी माणसांवर केला जाणारा अन्याय खपवून घेणार नाही. काहीतरी वेगळे करू, असे आश्वासन देऊन तु्म्ही सत्तेवर आलात आणि आता कॉंग्रेस-राष्ट्रवादीचेच प्रकल्प तुम्ही पुढे नेत आहात. मग तुमची गरजच काय, असा प्रश्नही त्यांनी युती सरकारला विचारला. मेट्रोसारख्या प्रकल्पासाठी दादर, गिरगावमधल्या मराठी माणसाचे पुनर्वसन होऊच शकणार नाही, त्यापेक्षा हे प्रकल्पच रद्द करा, असेही त्यांनी सांगितले.