देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं लॉकडाउनची घोषणा केलेली आहे.  या कालावधीत अनेक प्रकारची निर्बंध लादण्यात आलेली आहेत. ज्यामध्ये दुकानं केवळ दोन तासं उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारवर टिका केली आहे.

तुम्ही दोन तासं दुकानं कसली उघडी ठेवता आहात? दुकानं दिवसभर उघडी ठेवा, ज्या लोकांना जेव्हा जायचं आहे तेव्हा जातील, रांगेत उभे राहतील, अंतर ठेवून उभे राहतील. मात्र तुम्ही दोन तासंच दुकानं उघडी ठेवाल तेव्हा तिकडं ज्यावेळी झुंबड होते, तेव्हा तुम्ही म्हणतात की कुणी इथं नियमांचं पालन करत नाही. आता म्हणता आम्ही दुकानं बंद करतो, हा कुठचा थिल्लरपणा?  असा परखड सवाल राज ठाकरेंनी यावेळी केला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

यावेळी राज ठाकरे म्हणाले, सुरूवातीला काही गोष्टी बऱ्या वाटल्या पण आता काही गोष्टींचे निर्णय ठामपणे घेतले नाहीतर ते बरोबर होणार नाही. आता लॉकडाउनचं सर्वात मोठं संकट आहे, हे लॉकडाउन तुम्ही कधी काढणार आहात? कसं काढणार आहात? हे तुम्ही लोकांसमोर येऊन सांगणं आता आवश्यक आहे. ज्या प्रकारे तुम्ही एक दिवशी तुम्ही अचानक येता व सांगता उद्यापासून बंद. बंद म्हणजे काय? तुम्ही यासाठी चार-सहा दिवस देणं गरजेचं होतं. लोकांना कळणं गरजेचं होतं. अशी परिस्थिती असताना मग आता तुम्ही लॉकडाउन काढणार कसा? कसं जायचं पुढे, काय होणार आहे पुढे? या गोष्टी सरकरानं समोर येऊन सांगणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी मुख्यमंत्र्यांनीच येऊन सांगितलं पाहिजे असं गरजेचं नाही, इतरही काही मंत्री आहेत, त्यांनी देखील पुढे येऊन याबाबत सांगायला हवं.