मुंबईसारख्या जुन्या आणि नामांकित विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड तज्ज्ञ, संशोधक आणि तत्त्वज्ञ या तीन महत्त्वाच्या गुणवत्तांच्या आधारे व्हायला हवी, असा सर्वसामान्य संकेत आहे. परंतु हा संकेत पाळणे दूरच वेळुकरांकरिता कुलगुरूपदासाठीचे प्राथमिक पात्रता निकषही कसे धाब्यावर बसविण्यात आले होते, याचा हा थोडक्यात आढावा..
ऌ कुलगुरूपदासाठी तत्कालीन उच्च शिक्षण सचिव जे. एस. सहारिया यांच्यासमवेत भुवनेश्वरच्या कलिंगा इन्स्टिटय़ूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजीचे तत्कालीन कुलगुरू डॉ. ए.एस. कोळसकर आणि बँगलोरच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस’चे तत्कालीन संचालक प्रा. बी. बलराम यांची शोध समिती नेमण्यात आली होती. मुळात या समितीत सरकारी अधिकाऱ्याचा समावेश करण्यावरच आक्षेप उपस्थित करण्यात आले होते.
ऌ२०१०मध्ये विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी प्रत्यक्षात निवड प्रक्रिया राबविण्यात आली, तेव्हा तब्बल ९८ जणांनी अर्ज केले. त्यापैकी पाच जणांची शिफारस तत्कालीन राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्याकडे केली. यात अर्थातच वेळुकर यांच्या समवेत डॉ. नरेशचंद्र (सध्याचे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू), डॉ. एन. एस. गजभिये, डॉ. अलका गोगटे, डॉ. नीलिमा क्षीरसागर या पाच जणांचा समावेश होता. मुळात इतरांचा अध्यापन व प्रशासकीय कामाचा अनुभव, संशोधन कार्य आदी पाहता वेळुकर यांची निवड या जणांमध्ये तरी कशी केली याचाच शोध घेण्याची गरज आहे.
ऌ संख्याशास्त्र हा वेळुकर यांचा अभ्यासविषय. पण या विषयातील आपल्या पीएच.डी.ची तारीखच वेळुकरांनी राज्यपालांना दिलेल्या बायोडाटामध्ये नमूद केली नव्हती. पीएच.डी.ची तारीख नसताना त्यानंतरचे पाच शोधनिबंध तपासायचे तरी कसे, असा प्रश्न होता.त्यातून वेळुकर यांच्या पीएच.डी. संदर्भातही अनेक वाद आहेत.
ऌतिसऱ्या शोधनिबंधाच्या निकषाबाबत न्यायालयानेच आक्षेप नोंदविला आहे. नियमानुसार संबंधित उमेदवाराचे हे शोधनिबंध आंतरराष्ट्रीय अथवा राष्ट्रीय दर्जाच्या जर्नल अथवा दर्जेदार पुस्तकामध्ये प्रसिद्ध झालेले असले पाहिजे. असे १२ शोधनिबंध लिहिल्याचा दावा वेळुकर यांनी केला होता. पण, यापैकी चार हे निबंध नसून ‘प्रॉब्लेम’ आहेत, तर एक प्रॉब्लेमचा ‘रिझल्ट’ आहे. उरलेल्या आठपैकी दोन तर तेव्हा (२०१०)प्रसिद्धच झाले नव्हते. या सगळ्याची चिरफाड न्यायालयात झाल्याने वेळुकर यांना प्रतिज्ञापत्र करून त्यांनी बायोडाटामध्ये दाखविलेल्या १२ शोधनिबंधांपैकी सात शोधनिबंध म्हणून विचारात घेऊ नका, असे सांगण्याची नामुष्की ओढवून घ्यावी लागली होती.
ऌप्रशासकीय कामाच्या पाच वर्षांच्या अनुभवाबाबतही हे उमेदवार वेळुकर यांच्या तुलनेत १० ते १५ वर्षांनी पुढे होते.
ऌअध्यापनाच्या व शैक्षणिक कामाच्या अनुभवाबाबतही हा फरक २० ते २५ वर्षे इतका आहे.
ऌमेजर संशोधन प्रकल्पांच्या बाबतीतही डॉ. गजभिये, डॉ. गोगटे, डॉ. क्षीरसागर हे किती तरी पुढे आहेत.