माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री बिअंतसिंग यांचे फाशीची शिक्षा सुनाविण्यात आलेले मारेकरी, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब आणि संसदेवरील हल्लाप्रकरणी अफझल गुरुला फासावर लटकविण्यात आल्यानंतर आता गृहमंत्रालयाच्या रडावर आहेत.
राजीव गांधी हत्या प्रकरणातील  तिन्ही आरोपींनी त्यांचा दयेचा अर्ज फेटाळण्याच्या राष्ट्रपतींच्या कृतीला मद्रास उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणाचा केंद्रीय गृहमंत्रालयाने आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. न्यायालयातील याचिकेची सद्यस्थिती, सरकारच्या वतीने कोणती भूमिका घेता येईल याबाबत सध्या विचार करण्यात येत असल्याचे गृह मंत्रालयाच्या उच्चपदस्थांकडून सांगण्यात आले. राजीव गांधी हत्याप्रकरणातील आरोपींना फाशी देण्यास तामिळनाडूत द्रमुकसह काही राजकीय पक्षांचा तीव्र विरोध आहे. मद्रास उच्च न्यायालयातील प्रलंबित खटला लवकर निकाली निघावा, असा गृहमंत्रालयाचा प्रयत्न आहे.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री बिअंतसिंग यांच्या हत्येतील आरोपी बलवंतसिंग राजोना याला फाशी देण्यास सत्ताधारी अकाली दलाचाच तीव्र विरोध आहे. सध्या या प्रकरणाचाही गृहमंत्रालयाकडून आढावा घेण्यात येत आहे. अफझल गुरूच्या फाशीचा विषय जम्मू आणि काश्मिरचा विचार करता नाजूक होता. पण सरकारने खंबीर भूमिका घेतली, असे गृहमंत्रालयाचे म्हणणे आहे. राजीव गांधी आणि बिअंतसिंग  हत्येप्रकरणातील आरोपींची फाशी हा मुद्दा तामिळनाडू आणि पंजाबच्या राजकारणाचा विचार करता संवेदनशील आहेत. कसाब आणि अफझल गुरूप्रमाणेच या आरोपींना फाशी देण्याबाबत गृहमंत्रालय गंभीर असल्याचे सांगण्यात आले.