अनेक वर्षे आपल्या आसपासच राहणाऱ्या एखाद्या माणसाशी आपली काही निमित्ताने ओळख होते आणि एवढय़ा छान माणसाशी एवढी वर्षे आपण मैत्री का केली नाही याची हळहळ मनाला वाटायला लागते. अगदी तस्संच झालं मला रानगावच्या समुद्रकिनाऱ्याचं प्रथम दर्शन  झालं तेव्हा! सूर्यास्त आणि समुद्रकिनारे यांचं आपल्या मनात अतूट नातं असतं. सूर्यास्त आणि समुद्रकिनारे दोघेही स्वतंत्ररीत्या सुंदरच असतात; पण दोघांचं एकत्र येणं म्हणजे मुळात सुंदर असलेल्या स्त्रीने सुरेख साडी नेसावी आणि बघणाऱ्याला कळेनासं व्हावं की नक्की साडीमुळे स्त्रीचं रूप  खुलतंय की त्या सौंदर्यवतीने नेसल्यामुळे साडी उठून दिसते.

मी रानगाव समुद्रकिनाऱ्यावर पोचले तेव्हा सूर्यास्ताला अवकाश होता, त्यामुळे सूर्यबिंब अजून केशरी झालं नव्हतं, पण अस्सल सोन्याच्या तारेनी विणलेला पैठणीचा पदर रसिकासमोर पेश करावा तशा डौलात सोनेरी प्रकाशाचा एक झोत समुद्राच्या पृष्ठभागावर पहुडला होता. त्या झोताच्या आजूबाजूला काही मच्छीमारी होडय़ा डुलत होत्या. मागे निळ्या आकाशाचा विस्तीर्ण पट आणि तितकाच भव्य किनारा. किनाऱ्यावर कोरडी मुलायम भुरकट वाळू, लाटांच्या येण्याजाण्याने उंचसखल नक्षी झालेली थोडी घट्ट काळी वाळू आणि अगदी लाटांजवळ काहीतरी नक्षी चितारण्याचा मोह होईल अशी कोऱ्या पाटीसारखी अगदी सपाट राखाडी वाळू असे तीन स्तर दिसत होते. किनाऱ्याच्या अगदी जवळ लाटांवर एक होडी डचमळत होती. जणू या.बसा.असं खुणावत होती. किनाऱ्याच्या इतक्या जवळ होडय़ा म्हणजे हा सागरकिनारा पोहायलासुद्धा सुरक्षित असावा. दूर वाळूवर काही तरुणांचा व्हॉलीबॉल खेळ रंगात आला होता. सपाट वाळूवर कुल्र्यानी बीळ खोदताना काढलेल्या वाळूच्या गोळ्यांची सुरेख नक्षी जागोजागी झाली होती. ओलसर वाळूचा तो पोत अन् ती नक्षी तलम पारदर्शक साडीवर त्याच रंगाच्या धाग्यांनी ‘सेल्फ डिझाइन’ काढावं तशी मोहक दिसत होती. उंचसखल काळ्या वाळूच्या पट्टय़ावर तर नक्षीची एवढी दाटी झालेली होती की ज्ञानकमळासारखी एखादी गुंतागुंतीची रांगोळी अनाम कलाकारानी भव्य प्रमाणात काढल्याचा भास व्हायचा. वाऱ्याच्या प्रवाहामुळे होडय़ा सोनेरी झोताच्या आगेमागे व्हायच्या आणि तो सोनेरी झोतसुद्धा क्षणोक्षणी विविध मायावी आकार धारण करत होता. एका क्षणी त्यानं एका सोनेरी चषकाचं रूप धारण केलं आणि ‘काठोकाठ भरू द्या प्याला .फेस भराभर उसळू द्या’ या बाकीबाब बोरकरांच्या ओळी मूर्तिमंत साकार झाल्या. निसर्गाचं हे सुंदर रचनाचित्र अनेक कलाकारांच्या सृजनशीलतेला प्रेरणा देईल असं होतं. विशेष म्हणजे संवेदनशील मनाची तन्मयता भंग होईल असं काहीही अस्वच्छ  आजूबाजूला नव्हतं.

किनाऱ्याला अगदी लागूनच भाज्यांचे हिरवेगार मळे आणि फूलशेती आहे. या परिसरात राहती घरेही अभावानीच आहेत. इमारती तर दूरच! त्यामुळे खूप विस्तीर्ण आभाळाचं विनाव्यत्यय दर्शन मनसोक्त घेता येतं.

हा किनारा इतका अस्पर्श राहण्याचं कारण स्वत:च्या वाहनाशिवाय इथे येणं जरा जिकिरीचं आहे. वसई स्थानकापासून आपण जसजसे आत जाऊ , तसतसे शहरीकरण कमी होत जाते. बाभोळा, देवतलाव वासळई अशा गावांचे टप्पे गाठताना हिरवाई गडद होऊ  लागते. सुंदर टुमदार बंगले दुतर्फा दिसतात. झाडांची गर्दी वाढू लागते. वसई नालासोपारा पट्टय़ातल्या अंतर्भागातल्या कोणत्याही  ठिकाणाकडे जाणाऱ्या रस्त्याचं वर्णन करताना ‘हिरवाई’, ‘सुंदर तळी’ ..हे शब्द वगळून पुढे जाताच येणार नाही. पुनरावृत्ती वाटेलही; पण काही वेळा ‘मंझील से बढकर रास्तेभी खुबसुरत होते है.’ अर्थात काही गोष्टी सर्वत्र असल्या, तरी प्रत्येक रस्त्याचं वैशिष्टय़ असतंच म्हणा. या रस्त्याला केळीच्या बागांची दाटी आहे. रानगावचं अस्सल गावपण अजून टिकून आहे. तळ्याच्या काठी असलेली ग्रामदेवतांची मंदिरं, डोक्यावरच्या टोपलीत नारळीच्या झापांचा भारा घेऊन येणाऱ्या ललना, बस स्टॉपजवळ मुद्दाम बांधलेला मासळी बाजार ही सारी दृश्ये त्याची साक्ष देतात. गावाच्या बाहेर पडलं की रस्त्याच्या दुतर्फा खारफुटीची झुडपे दिसतात. नंतर आभाळाशी गप्पा मारणाऱ्या माडांची दाटी दिसू लागते आणि मग रस्ता संपतो तिथेच येतो. रानगांवचा सागरकिनारा.

रस्त्यालगतच वाडय़ा आणि मळे असल्यानी इथे पार्किंगची वानवा आहे. सुटीच्या दिवशी आधीच चिंचोळ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाक्या लागल्यावर चारचाकी गाडी न्यायला अडचण येते. इथे वारंवार येणं सोपं नाही हे खरं, पण ताजमहालचं सौंदर्य आयुष्यात एकदाच पाहिलं तरी त्याचा विसर पडू शकतो का?

रानगाव, ता. वसई

कसे जाल? : वसई स्थानकाच्या पश्चिमेकडून रानगावच्या बस सुटतात. शेअर  रिक्षाही मिळतात किंवा वासलईपर्यंत शेअर रिक्षाने येऊन पुढे स्पेशल रिक्षा करावी लागते. स्थानकापासून १५ किलोमीटर अंतरावर हा किनारा आहे. नालासोपाऱ्याहून गिरिजमार्गे वासलाईपर्यंत येऊन पुढे जावे. कुठलेच सार्वजनिक वाहन थेट किनाऱ्यापर्यंत जात नसल्याने स्वत:चे वाहन घेऊन येणे उत्तम.