लग्नाचे आश्वासन देत फसवणुकीचा आरोप

मुंबई : लग्नाचे आश्वासन देत गेली काही वर्षे लैंगिक अत्याचार केल्याच्या तक्रारीवरून व्ही. पी. मार्ग पोलिसांनी नौदल अधिकाऱ्याविरोधात गुन्हा नोंदवला. तक्रारदार तरुणीने या अधिकाऱ्याविरोधात आर्थिक फसवणुकीचाही आरोप  केला. तसेच विविध शहरांसह युद्धनौकांवरही दोघांच्या भेटी घडल्याचा दावा  केला.

३१ वर्षीय तरुणीने केलेल्या तक्रारीनुसार पाच वर्षांपूर्वी समाजमाध्यमाद्वारे नौदलात कनिष्ठ अधिकारी पदावर नियुक्त तरुणासोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर आधी मैत्री आणि नंतर प्रेमात झाले. तरुणाने लग्नाचे आश्वासन दिले होते. त्या जोरावर मुंबईसह विविध शहरांमध्ये दोघांच्या वरचेवर भेटी होऊ लागल्या. यातील काही भेटी युद्धनौकांवर झाल्या. मात्र अलीकडेच या तरुणाने अन्य तरुणीसोबत विवाह के ल्याचे लक्षात आले. जाब विचारल्यावर त्याने संपर्क तोडला.

दरम्यान, तरुणाने दोन लाखांहून अधिक रक्कम विविध निमित्त करून घेतली. मात्र ती परत के ली नाही. त्यामुळे शारीरिक, भावनिक आणि आर्थिक फसवणूक झाल्याचा दावा तरुणीने तक्रारीत के ला.

या तक्रारीआधारे व्ही. पी. मार्ग पोलिसांनी दिल्ली येथे नियुक्त असलेल्या नौदल अधिकाऱ्याविरोधात बलात्कार, फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. त्याबाबत अधिकाऱ्याच्या वरिष्ठांना माहिती कळविली आणि कारवाईसाठी एक पथक दिल्ली येथे रवाना झाले. मात्र हा अधिकारी गेल्या काही दिवसांपासून गैरहजर असल्याची माहिती नौदल कार्यालयातून पोलीस पथकाला देण्यात आली. त्यामुळे कारवाईच्या भीतीपोटी हा अधिकारी फरार झाला असावा, असा संशय पोलिसांनी वर्तविला.