‘ग्रंथाली’ प्रकाशनाकडून साजरा केला जाणारा ‘वाचक दिन’ यंदा २५ डिसेंबरला सायंकाळी ४ ते ९ या वेळेत कीर्ती महाविद्यालयाच्या पटांगणात होत आहे. ग्रंथालीच्या वाचक दिनाचे हे ४१वे वर्ष असून यंदाही अनेक साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद वाचकांना घेता येणार आहे. वाचक दिनी ग्रंथालीच्या तब्बल दहा पुस्तकांचे प्रकाशन नाटककार मकरंद साठे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ‘पॉप्युलर प्रकाशना’च्या सहकार्याने होणाऱ्या या प्रकाशनात कवयित्री नीरजा यांचे ‘शब्दारण्य’, राम पंडित यांनी संपादित केलेले ‘छांदस’, किशोर आरस यांनी संकलित केलेले ‘पॉप्युलरचं अंतरंग’ आदी दहा पुस्तकांचा समावेश आहे. याशिवाय ‘महानगरी कुटुंबव्यवस्था- आज आणि उद्या’ या विषयावर होणाऱ्या परिसंवादात मंगला सामंत, डॉ. मनोज भाटवडेकर, अ‍ॅड. जाई वैद्य, सुयश टिळक आणि नंदिता धुरी सहभागी होणार असून मुकुंद कुळे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. याचबरोबर ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतील कलाकारांशी गप्पांचा कार्यक्रम होणार असून आशीष पाथरे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. वाचक दिनाची सांगता मिलिंद जोशी यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘गाणारी गझल’ या मराठी गझलांच्या मैफलीने होणार आहे.