कथित ‘ढ’ विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने हुशार बनविणारा ‘वाचन- लेखन’ प्रकल्प आता राज्यभरात लागू होणार आहे. सध्या या उपक्रमाची अंतिम आखणी सुरू असून महिनाभरात त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
शिक्षक दिनानिमित्त शालेय शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांनी राज्यातील सर्व मुख्याध्यापकांना पाठविलेल्या पत्रात या उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. शाळेतील मुलांना काहीच येत नाही. पाचवीच्या मुलांना दुसरीचे पुस्तक वाचता येत नाही आणि सातवीचा विद्यार्थी चौथीचे गणित सोडवू शकत नाही, अशी राज्यातील शिक्षणाची स्थिती असल्याची चर्चा वारंवार होते. त्यावर उपाय योजना करण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने ढ मुलांना हुशार करण्यासाठी सरकारने ‘प्रथम फाऊंडेशन’च्या मदतीने वाचन लेखन आणि गणित विकास कार्यक्रम हा पथदर्थी प्रकल्प काही महिन्यापूर्वीच राज्यात राबविला. ३५ जिल्ह्य़ांतील प्रत्येकी एका तालुक्यातील १०० शाळांमध्ये हा प्रयोग राबविण्यात आला. त्यानुसार दुपारच्या भोजनापूर्वीच्या दोन तासिकांमध्ये जिल्हा परिषदेच्याच शिक्षकांनी या मुलांमध्ये मिसळून हसत खेळत त्यांना शिकविले. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार त्यांचे गट करण्यात आले. त्यांच्या नेमक्या काय उणिवा आहेत हे हेरून त्यांना शिकविण्यात आले. खूप सराव करून घेण्यात आला. १०० दिवसांतील या उपक्रमामुळे कथित ढ विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत आमूलाग्र सुधारणा झाली.  विद्या परिषदेच्या माध्यमातून याचे नियोजन सुरू असून माहिनाभरात त्याची अंमलबजावणी सुरू केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रगतीचे पंख..
या प्रयोगापूर्वी दुसरीतील ७० टक्के विद्यार्थी शब्द वाचू शकत होते. उपक्रमानंतर ते प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत वाढले. वाक्य वाचणाऱ्या विद्यार्थ्याचे प्रमाण ५३ वरून ७५ टक्के, उतारा वाचणाऱ्यांचे प्रमाण ३४ वरून ५३ टक्के तर श्रुतलेखन करू शकणाऱ्यांच्या प्रमाणात ६०वरून ७६ टक्के वाढ झाली. एकंदरीत वाचन लेखन कौशल्यात २० टक्के वाढ झाली.