मुंबई, ठाण्यात बंगाली परंपरांचे प्रतिबिंब; विविध सामाजिक संस्थांना साहाय्य

बंगालचा सर्वात मोठा उत्सव असलेली दुर्गापूजा मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरांतही उत्साहात केली जाणार आहे. दादर, फोर्ट परिसर, मालाड, जुहूसह अन्यही काही ठिकाणी दुर्गोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने रवींद्र संगीत, सिंदुरखेला, धुनिची नृत्ये, ओडिसी-बंगाली नृत्ये अशा विविध लोककलांचा आनंद मुंबईकरांना घेता येणार आहे. बंगालमधील हस्तकलेच्या वस्तू आणि खाद्यपदार्थाची रेलचेलही उत्सवस्थळी असणार आहे.

या वर्षी १४ ते १९ ऑक्टोबरदरम्यान दुगरेत्सव साजरा होणार आहे. बंगालहून आलेल्या मूर्तिकारांनी साकारलेली देवीची मूर्ती या उत्सवाच्या ठिकाणी पाहायला मिळेल. ही मूर्ती बंगालच्या मातीतून साकारली जाते. दादरमधील ‘बंगाल क्लब’ १९३५ पासून दरवर्षी दुर्गापूजेचे आयोजन करतो. २० हजार चौरसफुटांच्या मंडपात ही दुर्गापूजा मांडली जाईल. उत्सवात पारंपरिक बंगाली ढाकीजचा (ड्रम्स) नाद भाविकांना ऐकता येणार आहे. त्याचबरोबर धुनिची नृत्ये, शंखनाद इत्यादी स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. कुमारी पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय विविध बंगाली पारंपरिक खाद्यपदार्थ, हातमागावरील कपडे, दागिने आदींचे प्रदर्शनही येथे भरवण्यात येणार आहे.

फोर्ट भागातील ‘बॉम्बे दुर्गा समिती’ हे मुंबईतील आणखी एक जुने दुगरेत्सव मंडळ आहे. मंडळाचे यंदाचे ८९ वे वर्ष आहे. जत्रा, नृत्याबरोबरच येथे समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. या वर्षी मंडळ गरजू मुलांना शिष्यवृत्ती आणि वंचित मुलांना जेवण आणि कपडे देणार आहे. पूजाकाळातील देणग्या अपंग विद्यार्थ्यांच्या संस्थांना दिल्या जाणार आहेत. रवींद्र संगीत, फ्युजन बॅण्ड, गायन, स्टॅण्डअप कॉमेडी, लोकनृत्य आणि धुनिची नृत्ये सादर केली जाणार आहेत.

मालाड येथील ‘मैत्री कल्चरल असोसिएशन’तर्फे सरबोजोनिन दुगरेत्सव गेल्या पाच वर्षांपासून साजरा होत आहे. येथे दररोज हजारहून अधिक मुलांना मोफत जेवण दिले जाते. यंदाच्या उत्सवात पारंपरिक आणि आधुनिक नृत्याविष्कार, ओडिसी-बंगाली नृत्य, लहान मुलांचे नृत्य, शास्त्रीय गायन, पुष्पांजली, सिंदुरखेला आणि खाद्योत्सव असणार आहे.

जुहू तारा रोडवरील ‘नॉर्थ बॉम्बे दुर्गा मंडळ’ लोखंडवाला बागेत गेल्या २२ वर्षांपासून दुगरेत्सव साजरा करीत आहे. इथल्या पूजेला दरवर्षी बॉलीवूडमधील अनेक तारे हजेरी लावतात. ‘पवई वेल्फेअर असोसिएशन’तर्फे १२ वर्षांपासून दुगरेत्सव साजरा केला जात आहे. या वर्षी प्लास्टिकबंदीविषयी प्रबोधन केले जाणार आहे. ‘चेंबूर दुर्गापूजा असोसिएशन’ ६३ वर्षांपासून दुगरेत्सव साजरा करीत आहे. दरवर्षी साधारण दीड लाखाहून अधिक भक्त या ठिकाणी येतात. नावीन्यपूर्ण देखावे हे या मंडळांचे वैशिष्टय़ आहे.

पाच दशकांची परंपरा

* नोकरी-व्यवसायानिमित्त ठाणे परिसरात स्थायिक झालेला बंगाली समाज इथे पारंपरिक दुर्गोत्सव साजरा करतो. हा उत्सव घोडबंदर रोड येथील हायलँण्ड गार्डन मैदानावर आयोजित करण्यात येतो.

* ठाण्यातील ‘बंगीया परिषदे’तर्फे १९६३ पासून नियमितपणे हा उत्सव साजरा केला जातो. यंदा दुर्गापूजेचे ५६ वे वर्ष आहे. यंदा आसाम येथील शिवादल मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. देखावा बांबूपासून उभारला आहे.

* आदिवासी पाडय़ांतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती ठाण्यातील बंगीया परिषदेचे सचिव चंदन अधिकारी यांनी दिली. सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत दुर्गापूजा व कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.