अन्न व औषध प्रशासनाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात

बनावट सौंदर्य प्रसाधनांची निर्मिती करून ग्राहकांना फसवणाऱ्या कंपन्यांना लवकरच चाप बसणार आहे. सौर्दय प्रसाधनांच्या विक्रेत्यांना नोंदणी करणे बंधनकारक करण्यासाठी कायद्यात बदल करण्याचा अन्न व औषध प्रशासनाचा मसुदा अंतिम टप्प्यात आहे. तो लागू झाल्यास ब्युटी पार्लर, सलूनपासून ते सौंदर्य प्रसाधनांची विक्री करणारी किराणा मालाची छोटी दुकाने, सुपरमार्केट यांनाही नोंदणी करणे सक्तीचे होईल.

औषधे आणि सौंदर्य प्रसाधने अधिनियमानुसार सौंदर्य प्रसाधनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना ती बनविण्यासाठी परवाना घेणे बंधनकारक आहे. मात्र यातून पळवाट काढत अनेक छोटे उत्पादक बाजारात उपलब्ध असलेल्या बॅ्रण्डची बनावट सौंदर्य प्रसाधने अवैध मार्गाने बाजारात विकत आहेत. अन्न व औषध प्रशासनाने अशा उत्पादकांवर बनावट सौंदर्य प्रसाधने विक्रीप्रकरणी कारवाईही केली आहे. परंतु बनावट सौंदर्य प्रसाधने बनवणाऱ्यांना कायमचा चाप लावण्यासाठी केंद्रीय अधिनियमामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव अन्न व औषध प्रशासनाने साधारण वर्षभरापूर्वी राज्य सरकारकडे मांडला होता. त्याचा मसुदाही प्रशासनाने सरकारकडे दिला होता.

वैद्यकीय शिक्षण आणि औषधे विभागाकडे मंजुरीसाठी दिलेला हा प्रस्ताव काही कायदेशीर बदल करण्यासाठी पुन्हा अन्न व औषध प्रशासनाकडे पाठविण्यात आला होता. यामध्ये कायदेतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक ते बदल केले असून दोन महिन्यांपूर्वी विभागाकडे पाठविण्यात आला आहे. तिथून आता लवकरच पुढील प्रक्रिया सुरू होईल. राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर केंद्र सरकारकडे कायद्यात त्यानुसार बदल करण्याची मागणी केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

सध्या अगदी किराणा मालाच्या दुकानापासून छोटय़ा दुकांनावरही सौंदर्य प्रसाधनांची विक्री होते. त्यांचे विक्रेते किती, कोण, कुठे होते याची आकडेवारीच उपलब्ध नाही. त्यामुळे सौंदर्य प्रसाधनांची विक्री करणाऱ्यांनी नोंदणी करणे बंधनकारक करण्याची मागणी या मसुद्याद्वारे प्रशासनाने केली आहे. त्यामुळे उत्पादकांसह विक्रेत्यांवर नजर ठेवणे सोपे होईल, असेही दराडे यांनी सांगितले.

शॅम्पू किंवा डिओच्या रिकाम्या बाटल्यांचा पुनर्वापर करून बनावट सौंदर्य प्रसाधनांची विक्री करणाऱ्या उत्पादकांवर प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी कारवाई केली आहे. या बाटल्यांवर कोणत्याही प्रकारचे सील नसल्याने त्यांचा अवैध वापर केला जातो. हे उत्पादक छोटय़ा विक्रेत्यांना ती विकतात. विक्रेत्यांनाही हा माल तुलनेने स्वस्त मिळत असल्याने तेही तो विकण्यास तयार असतात.

ग्राहकांची फसवणूक

बनावट सौंदर्य प्रसाधने ग्राहकांना ओळखता येत नसल्याने सहजपणे त्यांची फसवणूक केली जाते, असे अन्न व औषध प्रशासनातील एका अधिकाऱ्याने सांगितले. औषध विक्रेतेही सौंदर्य प्रसाधनांची विक्री करत असल्याने त्यांना यासाठी नव्याने नोंदणी करावी लागणार का, याबाबत मात्र अद्याप निर्णय झालेला नाही, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.