राज्यात वैद्यकीय प्राणवायूचा वापर योग्यरितीने केला जात नसल्याने आता पुन्हा एकदा याच्या  वापराचे लेखापरीक्षण केले जाणार आहे. तसेच रुग्णालयात प्राणवायूचा वापर अधिक काळजीपूर्वक करण्याकरिता नियमावली आरोग्य विभागाने तयार केली असून लवकरच याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

राज्यातील रुग्णालयांमध्ये दरदिवशी सध्या १६१५ मेट्रिक टन प्राणवायूचा वापर केला जातो. प्राणवायूवर असलेल्या रुग्णांना प्रतिमिनिट सात लीटर आणि यापेक्षा गंभीर प्रकृतीच्या रुग्णांना १५ लीटर प्रतिमिनिट ऑक्सिजनची आवश्यकता असते. यानुसार सध्या सक्रिय रुग्णांच्या तुलनेत ऑक्सिजनचा अतिवापर केला जात असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.  काही जिल्ह्यांमध्ये प्राणवायूचा अतिरिक्त वापर केला जात असल्याने अधिक पुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे आवश्यकता असलेल्या अन्य जिल्ह्यांना प्राणवायूचा पुरवठा केला जात नाही. उपलब्ध प्राणवायूचा काटेकोरपणे वापर करण्याचे धोरण स्वीकारले असून त्यानुसार रुग्णालयांसाठी नियमावलीही तयार केली आहे.

पुढील दोन दिवसांत ही नियमावली रुग्णालयांपर्यत पोहचविली जाईल. त्यानुसार प्राणवायूचा वापर केला जातो का याचे लेखापरीक्षणही केले जाणार आहे. जी रुग्णालये या नियमावलीचा अवलंब करणार नाहीत किंवा अतिरिक्त प्राणवायूचा वापर करत असल्याचे आढळेल. त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

जागतिक पातळीवर निविदा

४० हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, १३२ पी.एस.ए प्लांट, २७ ऑक्सिजन आयएसओ टँक(साठवणुकीसाठी), २५ हजार  मेट्रिक टन द्रावरुप प्राणवायू, दहा लाख रेमडेसिविर कुप्या याची खरेदी करण्यासाठी जागतिक पातळीवरील निविदा जाहीर केल्या आहेत. लवकरात लवकर उपलब्ध केले जाईल असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

१०० हून अधिक निर्मिती प्रकल्प

हवेतील प्राणवायूपासून वैद्यकीय प्राणवायू निर्मितीच्या(पीएसए प्लांट) १०० हून अधिक प्रकल्प उभारणीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच प्रत्येक रुग्णालयात अतिरिक्त प्राणवायू साठा असणे आवश्यक असून याची सुविधा रुग्णालयांनी निर्माण करण्याच्या सूचना रुग्णालयांना दिलेल्या आहेत.

‘ऑक्सिजन परिचारिका’

नंदुरबारमध्ये प्राणवायूचा काटकसरीने वापर करण्याचा चांगला प्रयोग केला आहे. ५० रुग्णांमागे एक परिचारिका  केवळ ऑक्सिजनची बचत कशी करता येईल याकडे लक्ष देते. काही वेळेस रुग्ण शौचालयात जाताना प्राणवायू चालूच ठेवतात किंवा काही आपआपसात गप्पा मारताना मास्क काढतात. अशा वेळी  प्राणवायू सुरूच राहतो. तेव्हा अशाप्रसंगी ही परिचारिका लगेचच प्राणवायूचा पुरवठा बंद करून अतिरिक्त वापर केला जाणार नाही याची दक्षता घेते, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

निर्मिती प्रकल्पाजवळच रुग्णालयाची उभारणी

राज्यात सहा ठिकाणी प्राणवायूची निर्मिती केली जाते. तेव्हा वेळेत प्राणवायू उपलब्ध होण्यासाठी यांच्या जवळच रुग्णालय उभारणी केली जाणार असून याअंतर्गत पेणमधील दोलवी गावात जे.एस.डब्ल्यू या प्राणवायू प्रकल्पाजवळ १०० खाटांचे रुग्णालय उभारणीसाठी परवानगी दिली आहे.

केंद्राकडून आणखी २ लाख रेमेडेसिविरच्या कुप्या

रेमडेसेविर  २ लाख ६९ हजार कुप्या केंद्राने पुरवण्याचे सांगितले होते. त्यात वाढ करून ४ लाख ३७ हजारापर्यत वाढ केली आहे. त्यामुळे राज्याला थोडा दिलासा मिळाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. राज्याला दरदिवशी ६० हजार कुप्याचा वापर केला जातो.