बेकायदा वास्तव्य करण्याच्या आरोपाखाली अटक

मुंबई :  बांगलादेशमधून स्थलांतरित झाल्यावर माझगाव येथे बेकायदा वास्तव्यास असल्याच्या आरोपाअंतर्गत अटक करण्यात आलेल्या ३० वर्षांच्या तरुणाची महानगर दंडाधिकाऱ्यांनी नुकतीच सुटका केली. जन्मदाखल्यावर तो भारतीय नागरिक असल्याने त्याची सुटका करताना नमूद केले.

पाच वर्षांपूर्वी २०१६ मध्ये रमजान शेख या तरुणाला पोलिसांनी अटक केली होती. डोंगरी येथील दुकानात बांगलादेशी नागरिक बेकायदा राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला होता.

वैध कागदपत्रांशिवाय शेख याने भारतात प्रवेश केल्याचे आणि येथे वास्तव्य केल्याचे सिद्ध करण्यात पोलिसांना अपयश आल्याचे न्यायालयाने सांगितले. आधारकार्ड, शिधापत्रक, पॅनकार्ड, वाहन परवाना ही कागदपत्रे भारतीय नागरिक असल्याचा पुरावा होऊ शकत नाही. परंतु ते सिद्ध करण्यासाठी जन्मदाखला, अधिवास दाखला आणि पारपत्राचा आधार घेता येऊ शकतो. निवडणूक वा मतदार ओळखपत्रही पुरावा म्हणून ग्राह्य धरता येऊ शकेल, असे न्यायालयाने म्हटले. शेख याने भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी सादर केलेल्या मूळ कागदपत्राचा आधार घेत न्यायालयाने त्याची सुटका केली.

जन्मदाखला बनावट असल्याचे सिद्ध करण्यात अपयश

शेखने खोटी कागदपत्रे जमा केल्याचा दावा पोलिसांतर्फे करण्यात आला होता. परंतु शेखने सादर केलेला जन्मदाखला खोटा असल्याचे सिद्ध करण्यात पोलिसांना अपयश आल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच जन्मदाखल्यावरून शेखचा जन्म भारतातीलच असल्याचे स्पष्ट होते, असेही नमूद केले.