बृह्नमुंबई महानगर पालिकेचा यंदाचा २०१९-२०चा अर्थसंकल्प आज (दि.४) सादर झाला. हा अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी दिलासा देणारा अर्थसंकल्प ठरला आहे. कारण, यंदा महापालिकेने कोणतीही नवी करवाढ केलेली नाही. या अर्थसंकल्पात ३०६९२.५९ कोटींची तरतुद करण्यात आली असून याचा फायदा मुंबईला उत्तम पायाभूत सुविधा तसेच सेवा सुविधा प्रदान करण्यासाठी होईल, असे पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी सांगितले.

रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणालीसाठी अर्थसंकल्पात २०६.२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यामुळे मुख्य आणि उपनगरीय रुग्णालये, प्रसुतिगृहे आणि आरोग्य केंद्रे यांना याचा मोठा फायदा होणार आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाकरिता आगामी आर्थिक वर्षात भांडवली खर्चाकरिता १७३.२३ कोटी आणि महसूली खर्चाकरिता २०२.४४ कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. यामुळे महापालिकेचा कामकाज जास्त कार्यक्षमपणे व पारदर्शकपणे होण्यास मदत होणार आहे.

शहरी गरीबांना विविध नागरी सुविधा पुरविणे आणि या सेवांचा दर्जा सुधारणे या हेतूने अर्थसंकल्पात ९२६८.९० कोटींची  गलिच्छ वस्त्यांमध्ये शौचालय बांधण्यासाठी १०४.४७ कोटींची तरतूद करण्यात आली असून महापालिका शौचालयांमध्ये पाणी पुरवठा आणि विद्युत पुरवठा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. आरोग्य आणि वैद्यकीय सेवांसाठी ४१५१.१४ कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. यामुळे नवीन रुग्णालयांची उभारणी व उपकरणांची दर्जोन्नती करण्यासाठी फायदा होणार आहे.

मिठी, दहिसर, पोयसर, ओशिवरा नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी तसेच नद्यांचे रुंदीकरण, पाण्याची गुणवत्ता सुधारणे, प्रदूषण रोखणे, मलनि:सारण वाहिन्यांचे जाळे, नदीकाठचे सौंदर्यीकरण करणे यासाठी ८२९.६८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शैक्षणिक सुविधांसाठी २७३३.७७ कोटींची तरतुद करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तु, खेळाची साधने, टिंकर लॅब, सीसीटीव्ही यांसह अनेक मुद्दे समाविष्ट आहेत.

नव्या पदपथांची निर्मिती तसेच बेकायदा खड्डे खोदाई रोखून दर्जात्मक पतपथ साकारण्यासाठी १०० कोटींची तरतुद करण्यात आली आहे. देवनार डंपिंग ग्राऊंडवरील कचऱ्यापासून ऊर्जानिर्मितीच्या ६०० टीपीडीच्या प्रकल्पासाठी १०० कोटींची तरतुद करण्यात आली आहे. उद्यान विभागासाठी २७७.२९ कोटींची तरतुद करण्यात आली असून याद्वारे अधिकाधिक खुली जागा उपलब्ध करुन देणे तसेच सध्याच्या हिरवाईचे संरक्षण करण्यात येणार आहे. रस्ते व वाहतूक विभागासाठी ३७० किमी रस्त्यांच्या सुधारणेसाठी १५२०.०९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

शिवाजी पार्क भागातच महापौरांसाठी नवे निवासस्थान बांधणार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापालिकेने ५ कोटींची तरतूद केली आहे. दरम्यान, जुन्या महापौर बंगल्यात हे स्मारक होणार असल्याने महापौरांसाठी नव्या बंगल्याची निर्मिती करण्यात येणार आहे. महापौरांचे हे नवे शासकीय निवासस्थान दादरच्या शिवाजी पार्क भागातील पालिकेच्या २,७४५ चौमीटर जागेत उभारण्यात येणार आहे. याच वर्षात याच्या बांधकामाला सुरुवात होईल. यासाठी १ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.