ग्रँट रोडमधील पालिका शाळेच्या भूखंडावर धार्मिक सोहळा

सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, मैदाने व मोकळय़ा भूखंडावर धार्मिक किंवा अन्य कार्यक्रमांना परवानगी न देण्याचे धोरण पालिका आयुक्तांनी आखले असताना पालिकेच्या अधिकाऱ्यांनीच हा नियम गुंडाळून ग्रँट रोडमध्ये एका धार्मिक कार्यक्रमाला परवानगी दिली आहे. पालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील टोपीवाला लेन म्युनिसिपल शाळेचा मोकळा भूखंड आणि लगतच्या मैदानावर धार्मिक कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नियमांना हरताळ फासून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमस्थळी अग्निसुरक्षा व आपत्कालीन प्रसंगी करावयाच्या उपाययोजनांकडेही डोळेझाक करण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, उद्याने आदी ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी पूर्वी पालिकेच्या विभाग कार्यालयांतील साहाय्यक आयुक्तांकडून परवानगी देण्यात येत होती. मात्र या कार्यक्रमांमुळे नागरिकांना त्रास होत असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमास परवानगी देण्याचे साहाय्यक आयुक्तांचे अधिकार काढून घेतले आहेत. सार्वजनिक ठिकाणी अत्यावश्यक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी केवळ आयुक्तांची परवानगी बंधनकारक केली आहे. पटसंख्या घसरल्यामुळे ग्रॅन्ट रोड येथील टोपीवाला लेन म्युनिसिपल शाळा बंद करण्यात आली. कालौघात शाळा इमारत धोकादायक बनली. त्यामुळे ही शाळा जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे आता हा भूखंड मोकळा आहे. ग्रॅन्ट रोड येथील एम. एस. अली रोडवरील शीतल इस्टेटमध्ये १५ ते २१ जानेवारी दरम्यान धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शीतल इस्टेटच्या पाठीमागे असलेल्या टोपीवाला लेन म्युनिसिपल शाळेचा रिक्त भूखंड आणि त्याला लागून असलेले मैदान या धार्मिक कार्यक्रमासाठी मिळावे यासाठी आयोजकांकडून पालिकेकडे अर्ज करण्यात आला होता. ‘डी’ विभाग कार्यालयातील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी तेथील धार्मिक कार्यक्रमास अटीसापेक्ष परवानगी दिली. तसेच अग्निशमन दलानेही या ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिले आहे.

या संदर्भात पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

अग्निसुरक्षा नियमांनाही हरताळ

  • धार्मिक कार्यक्रमासाठी शाळा भूखंडावर मोठा मंडप उभारण्यात आला आहे. धार्मिक कार्यक्रमासाठी येणाऱ्यांसाठी तेथे मोठय़ा प्रमाणावर अन्न शिजविण्यात येत आहे. त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर गॅस सिलिंडरही आणण्यात आले आहेत.
  • पालिकेकडून दिलेल्या परवानगीमध्ये तेथे अन्न शिजविण्यास मनाई करण्यात आली आहे. मंडपस्थळावरून सुखरूपपणे बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्गिका असावी अशीही अट घालण्यात आली आहे. परंतु या सर्व अटींना हरताळ फासून तेथे अन्नपदार्थ शिजविण्यात येत आहेत.
  • शीतल इस्टेट आणि टोपीवाला लेन म्युनिसिपल शाळेच्या मध्ये असलेली संरक्षक भिंतही तोडून टाकण्यात आली आहे.
  • टोपीवाला लेनमध्ये दाटीवाटीने इमारती उभ्या आहेत. शाळा भूखंडावर अन्न शिजविताना एखादी दुर्घटना घडल्यास कमला मिलसारख्या दुसऱ्या अग्नितांडवाची घटना घडू शकेल, अशी भीती येथील रहिवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.