दुर्घटनेतील जखमींचे अन्य रुग्णालयांत हाल 

नमिता धुरी, मुंबई</strong>

रक्तदाब, गुडघेदुखी, मूत्रपिंड या आजारांवरील उपचारांसाठी अंधेरीतील राज्य कामगार विमा रुग्णालयात दाखल झालेल्यांना सोमवारी आगीच्या दुर्घटनेनंतर भलत्याच जखमा आणि वेदनांसाठी उपचार घ्यावे लागले. या आगीत जखमी झालेल्यांवर कूपर, सेव्हन हिल्स, होली स्पिरिट या रुग्णालयांत उपचार सुरू असले तरी, त्यांचे वैद्यकीय कागदपत्रे, पैसे, औषधे इत्यादी सामान कामगार रुग्णालयातच अडकून पडले आहेत. त्यामुळे या रुग्णालयांत दाखल असलेल्यांची अवस्था ‘आगीतून फुफाटय़ात’ पडल्यासारखी आहे.

गुडघ्यांच्या आजाराने ग्रस्त असलेल्या पुण्याच्या २४ वर्षीय दीपाली करबाल दोनच दिवसांपूर्वी कामगार रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. सोमवारी दुपारी आग लागल्यानंतर लोकांनी मदतीसाठी बांधलेला दोर धरून चौथ्या मजल्यावरील अनेक जण खाली उतरत होते. त्यात दीपालीही होत्या. आपला जीव वाचेल की नाही या चिंतेत असताना त्यांचा हात दोरीवरून सुटला आणि त्या खाली कोसळल्या. दीपाली आता कूपर रुग्णालयात अंथरुणाला खिळून आहेत. त्यांचे पती आणि भाऊ काल रात्रीपासून रुग्णालयात त्यांच्यासोबत थांबले आहेत. सगळे सामान ‘कामगार’मध्ये अडकल्याने उपचार तर दूरची गोष्ट जेवणापुरतेही पैसे त्यांच्याकडे नाहीत.

मानखुर्दचे जनार्दन जाधव यांनीही कालची संपूर्ण रात्र कूपर रुग्णालयात बसून काढली. त्यांची ६० वर्षीय आई अंजिरा जाधव मूत्रपिंडाच्या उपचारांसाठी कामगार रुग्णालयात दाखल होती.  पण सोमवारच्या घटनेमुळे त्यांना कूपरला दाखल करावे लागले. अंजिरा यांना सुरू असलेली औषधे आणि त्यांचे वैद्यकीय कागदपत्र ‘कामगार’मध्येच आहेत. मात्र आगीबाबत संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय आणि रुग्णालयातील व्यवस्था नीट लावल्याशिवाय कोणालाही रुग्णालयात प्रवेश मिळत नसल्याने आता पुढचे उपचार कसे करायचे, असा प्रश्न जनार्दन यांच्यासमोर उभा राहिला आहे. ऑफिसला सुट्टी घेऊन रुग्णालयात बसावे लागल्याने त्यांचे आर्थिक नुकसानही होत आहे.

उच्च रक्तदाबाची तक्रार घेऊन कामगार रुग्णालयात आलेले ७१ वर्षीय सोनू मोहिते यांच्या नातेवाईकांचीही स्थिती काही वेगळी नाही. आग लागली तेव्हा त्यांची दोन्ही मुले त्यांच्यासोबत होती. वडिलांचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असताना त्यांच्या एका मुलाच्या पायाचे हाड मोडले. आता बाप-लेक कूपरमध्येच दाखल आहेत. पुढील उपचारांबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती त्यांना डॉक्टरांकडून मिळालेली नाही. डॉक्टरांनी बाहेरून आणायला सांगितलेल्या औषधांसाठीही त्यांच्याकडे पैसे नाहीत.

कर्मचारी संभ्रमात

एका बाजूला रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल होत असताना दुसऱ्या बाजूला कामगार रुग्णालयाचे कर्मचारीही संभ्रमात आहेत. रुग्णालय किती दिवस बंद राहणार, आम्ही पुन्हा कामावर कधी दाखल व्हायचे, या दिवसांचा पगार आम्हाला मिळणार का, असे अनेक प्रश्न घेऊन सर्व कर्मचारी रुग्णालयाच्या बाहेर दिवसभर ठाण मांडून बसले आहेत. मात्र प्रशासनाकडून अधिकृत सूचना त्यांना मिळू शकलेल्या नाहीत.