सोलापूर येथे निवासी डॉक्टर प्रशांत पाटील यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीनंतर राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी गेल्या दोन दिवसांपासून पुकारलेला बेमुदत संप शुक्रवारी दुपारनंतर मागे घेण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर निवासी डॉक्टरांच्या संघटनेने हा संप मागे घेतला असून रात्रीपासूनच सर्व निवासी डॉक्टर कामावर हजर होणार आहेत. संप मिटल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उच्च न्यायालयाने संप मागे घेण्याचा आदेश डॉक्टरांच्या संघटनेला दिला तसेच सरकारलाही फटकारले. या पोलिसाला तातडीने अटक करून कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
या संपात राज्यातील सुमारे चार हजार निवासी डॉक्टर सहभागी झाले होते. त्यात मुंबईतील महापालिकेच्या तीन आणि राज्य शासनाचे एक अशा चार रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांचाही समावेश होता. निवासी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णालयातील बाह्य़रुग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभाग येथे कोणतेही काम न झाल्याने रुग्णसेवेचा बोजवारा उडाला होता. तसेच रुग्णांचेही हाल झाले होते.
डॉक्टर विरुद्ध जनता संघर्ष
सोलापूर :  चिंताजनक स्थितीतील गर्भवती महिलेवरील उपचारास नकार देणाऱ्या डॉक्टराला मारहाण केलेल्या पोलीस अधिकाऱ्याची स्थानिक संघटना व पक्षांनी बाजू घेतली आहे. त्यामुळे सोलापुरात डॉक्टर विरुद्ध जनता असा संघर्ष उफाळला आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री अपघातातील जखमींना घेऊन पोलीस रुग्णालयात आले तेव्हा या गर्भवती महिलेवर उपचार करण्यात डॉक्टर टाळाटाळ करीत असल्याचे पाहून  पोलीस निरीक्षक अरुण वायकर यांनी त्या डॉक्टरला मारहाण केली होती.  राज्यभर ‘मार्ड’ने आंदोलन पुकारल्यावर वायकर यांच्यावर कारवाई झाली असली तरी सोलापुरात पोलिसांच्या बाजूने जनता सरसावली आहे.