भाडे नाकारण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी शहरातील टॅक्सींवर बसविण्यात येणारे ‘टॅक्सी टॉप्स’ आता रिक्षांवरही लावण्यात येणार आहेत. येत्या काही आठवडय़ांत शहरातील ४० हजार टॅक्सींवर हे टॉप्स दिसू लागणार असून त्यापाठोपाठ रिक्षांवरही हे टॉप्स लावण्यात येणार आहेत.
शहरातील टॅक्सी-रिक्षा चालकांकडून भाडे नाकारण्याच्या प्रवाशांच्या तक्रारी महिन्याला किमान १००च्या आसपास परिवहन विभागाकडे येत असतात. या तक्रारींचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागाने काही महिन्यांपूर्वी ‘टॅक्सी टॉप्स’ लावण्याची योजना आखली आहे.
 रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशाला येणाऱ्या टॅक्सीवरील टॉप्सवरून टॅक्सी रिकामी आहे किंवा नाही हे समजू शकेल. टॅक्सींवर लावण्यात आलेल्या टॉप्सवर ‘फॉर हायर’, ‘हायर्ड’ किंवा ‘ऑफ डय़ुटी’ या पैकी एक पर्याय दिसणार आहे. हिरव्या, नारिंगी आणि पांढऱ्या रंगातील हे पर्याय प्रवाशांना लांबूनही दिसतील. सध्या शहरातील अनेक टॅक्सींवर हे टॉप्स दिसू लागले असून आता रिक्षांवरही हे टॉप्स लावण्यात दिसणार आहेत. त्यासाठी परिवहन विभागाने असे टॉप्स बनविण्याबाबत उद्योजकांना आमंत्रित केले आहे.