* एक हजारांचाच मोर्चा
* वाहतुकीवरही परिणाम नाही
* ‘भारत बंद’मध्ये सहभागी होणार
रिक्षाचालक-मालकांना ‘सार्वजनिक सेवका’चा दर्जा देण्यात यावा, एक लाख नवे परवाने आणि १८ हजार मृत परवाने पुनरज्जीवित करावेत, रिक्षाचालकांना निवृत्तीवेतनादी आर्थिक लाभ द्यावेत आणि त्यांना स्वस्त दरात घरे द्यावीत आदी मागण्यांसाठी गुरुवारी करण्यात आलेल्या शक्तिप्रदर्शनाचा चांगलाच फज्जा उडाला.
परिवहन विभागाच्या वांद्रे येथील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये अवघे एक ते दीड हजार रिक्षाचालक-मालक सहभागी झाले होते. तर दिवसभरामध्ये उपनगरांतील रिक्षा वाहतुकीवरही कोणताही परिणाम जाणवला नाही.
डॉ. हकीम यांच्या अहवालातील शिफारशींनुसार रिक्षाचालकांना सार्वजनिक सेवकाचा दर्जा देऊन त्यांना निवृत्तीवेतनादी आर्थिक लाभ देण्यात यावेत या मागणीसाठी मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनच्या वतीने गुरुवारी वांद्रे येथे मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चामध्ये १० ते १५ हजार रिक्षाचालक-मालक सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्याचप्रमाणे दिवसभर उपनगरातील रिक्षा वाहतूक विस्कळीत हण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. तथापि, उपनगरातील वाहतुकीवर कोणताही परिणाम जाणवला नाहीच; पण रस्त्यावर वाहतूक कोंडीही कुठे झाली नाही. मोर्चामध्ये जेमतेम काहीशे रिक्षा सहभागी झाल्या होत्या.
दरम्यान, २० आणि २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ‘भारत बंद’मध्ये रिक्षाचालक सहभागी होणार आहेत ते आपल्या मागण्यांसाठी असे मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनचे सहसरचिटणीस शशांक राव यांनी स्पष्ट केले.
रिक्षाचालकांच्या मागण्या या बंदमध्ये मान्य झाल्या नाहीत तर ५, ६ आणि ७ मार्च रोजी तीन दिवस रिक्षा बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्य शासनाने तरीही आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर २५ एप्रिलपासून १ मेपर्यंत रिक्षा बंद ठेवण्यात येतील, असा इशारा राव यांनी दिला आहे.