वाहनाच्या काळ्या काचांवर कारवाई करत असताना मारहाण करून चार हजार रुपयांचे मनगटी घडय़ाळ तसेच ५० हजार रुपयांची सोनसाखळी खेचून नेल्याप्रकरणी ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पी. आर. चव्हाण यांच्यासह तीन कर्मचाऱ्यांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली
नाही.
ठाणे येथील उथळसर परिसरातील वैशाली इमारतीमध्ये प्रसाद हरिश्चंद्र गिरप (३२) राहतात. त्यांचा पोखरण रोड येथे कारखाना असून ३० ऑक्टोंबर २०१२ रोजी नौपाडा भागातील एका दुकानातून लोखंडी साहीत्य खरेदी करून ते स्विफ्ट कारने कारखान्यामध्ये जात होते. दरम्यान, मुंबई-नाशिक महामार्गावर नितीन कंपनी येथील एका बस स्टॉपजवळ वाहतूक पोलिसांनी त्यांची कार अडवली. त्यानंतर वाहन परवान्याची मागणी करून काळ्या काचांवर कारवाई करीत असल्याचे सांगत पोलीस निरीक्षक पी. आर. चव्हाण आणि तीन कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या हातातील चार हजार रुपयांचे घडय़ाळ आणि ५० हजार रुपयांची सोनसाखळी खेचून नेली. या प्रकरणी नौपाडा पोलीस तक्रार घेत नसल्याने प्रसाद यांनी न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतर गुरूवारी या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.