आंबे विक्रेत्यांनी बोरिवलीत सराफी पेढी लुटल्याचे उघडकीस आले आहे. चोरांनी  मेघा ज्वेलसच्या शेजारी भाडय़ाने दुकान घेतले होते आणि तीन महिन्यापासून ते आंबे विकत होते. सोमवारी त्यांनी सराफाच्या दुकानाची सामायिक भिंत आतून फोडून पेढीत प्रवेश करत चोरी केली.
बोरीवली पश्चिमेच्या शिंपोली येथे नितीन शहा यांचे मेघा ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. मंगळवारी  कर्मचाऱ्यांनी दुकान उघडले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. आतील सामान अस्ताव्यस्त पडले होते. चोरटय़ांनी दुकानाच्या बाजूच्या भिंतीला मोठे भोक पाडले व आत प्रवेश केला. गॅस कटरच्या सहाय्याने तिजोरीतील ७७ लाखांचे दागिने लंपास केले. चोरांनी याच दुकानाला लागून असलेल्या गाळ्यात आंब्याचे दुकान थाटले होते. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी तो गाळा भाडय़ाने घेतला होता. सोमवारी सराफांची दुकाने बंद असतात. त्यामुळे कुणालाही संशय आला नाही.
..पंधरा दिवसापूर्वीच इशारा
या घटनेच्या पंधरा दिवसाआधी परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांनी शहरातील सर्व सराफांची बैठक बोलावली होती. चोरांची टोळी अशापद्धतीने बाजूचे दुकान भाडय़ाने घेऊन नंतर चोरी करू शकतात असा इशारा दिला होता.