आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील मित्रपक्षांसाठी भाजपा-शिवसेना १८ जागा सोडणार आहेत. या १८ जागांपैकी रिपाइंला १० जागा देण्यात याव्यात अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाइं नेते रामदास आठवले यांनी केली आहे. त्याचबरोबर ही निवडणूक रिपाइं भाजपाच्या चिन्हावर लढणार नाही तर स्वतःच्या चिन्हावर लढवेल असेही आठवले यांनी स्पष्ट केले आहे. गुरुवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.

राज्यात नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी येत्या काही दिवसांत निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणाही करण्यात येईल आणि आचारसंहिताही लागू होईल.

ही विधानसभा निवडणूक थेटपणे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा-शिवसेना यांच्यात होणार आहे. मात्र, तत्पूर्वीच काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिग्गज नेते पक्ष सोडून भाजपा-शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. यावर राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोपही केला आहे. चौकश्यांचा ससेमिरा पाठीमागे लावण्याची भीती दाखवून विरोधकांचे नेते फोडण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरु असल्याचे पवारांनी म्हटले होते. मात्र, हे आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावले आहेत.