‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जमीन मिळालीच पाहिजे’, अशा घोषणा देत रिपब्लिकन युवक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मंत्रालय दणाणून सोडले. पहिल्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर निदर्शने करणाऱ्या १३ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून नंतर सोडून दिले.
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी इंदू मिलच्या जमीन हस्तांतरणाचा प्रश्न ६ डिसेंबरपूर्वी निकाली निघाला नाही, तर आरपीआयचे कार्यकर्ते मिलचा ताबा घेतील, असा इशारा दिला आहे. याच प्रश्नावर गुरुवारी, २९ नोव्हेंबरला दिल्लीत संसद भवनावर आरपीआयचा मोर्चा काढण्यात येणार आहे.
आरपीआय युवक आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी मंगळवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर इंदू मिलची जमीन मिळालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी सुरू केल्याने काही वेळ सुरक्षा कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. मुख्यमंत्री त्या वेळी मंत्रालयात नव्हते. घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व नंतर त्यांना सोडून देण्यात आले.