कायदा तोडणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात आरटीओने कारवाईचा बडगा उगारला आहे. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या पश्चिम उपनगरातील १४०० रिक्षाचालकांवर आरटीओकडून कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे फक्त गेल्या पाच महिन्यात ही कारवाई करण्यात आली आहे. दंड म्हणून त्यांच्याकडून ११ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.

आरटीओने कारवाई केल्यानंतरही रिक्षाचालकांची मुजोरी कायम असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. भाडं नाकारणे, उद्धट वागणे, मर्यादेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक अद्यापही चालू असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे. एका वरिष्ठ वाहतूक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांकडून येणाऱ्या तक्रारींची रोज दखल घेतली जात असून गणेशोत्सवादरम्यान रोज ही कारवाई सुरु राहणार आहे.

‘आमच्या मोहिमेदरम्यान तसंच प्रवाशांकडून येणाऱ्या तक्रारींची दखल घेत एकूण १३९४ मुजोर रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ११ लाख तीन हजार रुपये दंडदेखील वसूल करण्यात आला आहे. ८२ रिक्षाचालकांचं परमिट रद्द करण्यात आलं असून ६७ जणांचा वाहतूक परवाना रद्द करण्यात आला आहे. ज्या रिक्षांची नोंदणी आरटीओने रद्द केली होती, मात्र तरीही रस्त्यावर धावत होत्या त्यांना जेसीबीच्या सहाय्याने नष्ट करण्यात आलं आहे’, असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

आरटीओने टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक १८००-२२-००१० वर येणाऱ्या प्रत्येक तक्रारीला गांभीर्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे.