गुढी पाडव्याला वाहनांच्या नोंदणीसाठी भरण्यात आलेल्या शुल्कापोटी परिवहन विभागाला केवळ मुंबईतून सुमारे दोन कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. नव्या वाहनांच्या नोंदणीसाठी परिवहन विभागाने गुरुवारी, गुढी पाडव्याच्या दिवशी सर्व कार्यालये उघडी ठेवली होती. मुंबईतील तीन आणि पुणे तसेच पिंपरी-चिंचवड येथील प्रादेशिक परिवहन विभागांमध्ये १०६४ वाहनांची नोंदणी झाली. त्यापैकी मुंबईमध्ये ५१२ दुचाकी वाहने आहेत. ताडदेव येथील मध्य मुंबई प्रादेशिक परिवहन विभागामध्ये ६० दुचाकी तर ३७ मोटारींच्या नोंदणीशुल्क म्हणून २८ लाख रुपये जमा झाले. वडाळा येथील पूर्व उपनगर प्रादेशिक परिवहन विभागामध्ये २२० दुचाकी तर ८३ मोटारींची नोंदणी झाली असून ५० लाख रुपयांचे शुल्क जमा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. अंधेरी येथे सर्वाधिक वाहनांची नोंदणी झाली असून सर्वाधिक महसूलही याच विभागात जमा झाला आहे. अंधेरी येथे २३२ दुचाकी तर १९५ मोटारींची नोंदणी झाली आहे. त्यात दुचाकींचे नोंदणीशुल्क ८ लाख १८ हजार ९३ रुपये इतके असून मोटारींचे नोंदणीशुल्क एक कोटी आठ लाख २२ हजार १९ रुपये इतके जमा झाले आहे.
 पुणे येथे ४७ वाहनांची तर पिंपरी-चिंचवड येथे १९० वाहनांची नोंदणी झाली आहे.