सध्या आयपीएलमुळे सायंकाळच्या रेल्वे प्रवासातील बराचसा वेळ क्रिकेट सामन्याचे अपडेट घेण्यात जात आहे. तसा क्रिकेट आपल्या देशातील एक अविभाज्य घटक असल्याने क्रिकेटवरील चर्चा सुरू असली की, कुणी अनोळखी राहात नाही. परंतु याही पलीकडे रूटरया नावाने सुरू झालेल्या अ‍ॅपच्या व्यासपीठावरून जगभरातील दहा ते पंधरा हजार क्रिकेटप्रेमी एकाच वेळी एकत्रितपणे सामन्याचा आनंद लुटत आहेत.

देशातील क्रीडा प्रेक्षकवर्ग सातत्याने वाढत आहे. २०१४-१६ या कालावधीत टीव्हीवर क्रीडा प्रकार पाहणाऱ्यांच्या संख्येत तब्बल ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही आकडेवारी केपीएमजीने आपल्या अहवालात प्रसिद्ध केली आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांत देशात क्रीडा प्रकारांच्या सादरीकरणात मोठा बदल झाला आहे. आयपीएल, पीएसएल, आयएसएल यांसारख्या प्रकारांमुळे प्रेक्षक जास्त आकर्षित होऊ लागला. ही संख्या दिवसेंदिवस वाढत राहणार आहे. तसेच सामने पाहण्यासाठी टीव्हीसमोर बसून राहण्याइतका वेळ सध्या कुणाकडे नाही. यामुळे विविध अ‍ॅपच्या माध्यमातून खेळाचे अपडेट्स मिळवणे किंवा ज्यांच्याकडे प्रक्षेपणाचे हक्क आहेत अशा वाहिन्यांच्या अ‍ॅपच्या माध्यमातून सामने पाहिले जातात; पण हे सर्व करत असताना आपल्याबरोबर आपला मित्र असता तर असे अनेकांना वाटत असते. यामुळेच आज अनेक क्रीडाचाहत्यांनी त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप समूह तयार केले आहेत आणि त्या माध्यमातून ते आपल्या सामान्यांबाबतच्या भावना शेअर करत असतात. हे करण्यासाठी त्यांना अ‍ॅपमधून बाहेर येऊन व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करून भावना शेअर कराव्या लागतात, तेही आपल्या ओळखीच्याच लोकांसोबत. आपण जेव्हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जातो तेव्हा प्रत्येक जण त्या सामन्याचा तितक्याच मनापासून आनंद लुटत असतो. अशा हजारो चाहत्यांना ऑनलाइन एकत्र आण्यासाठी व त्यांना एकाच अ‍ॅपमध्ये सामन्याचा तपशील व त्या खेळाच्या इतर चाहत्यांशी बोलण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रूटर या अ‍ॅपची निर्मिती झाल्याचे संस्थापक पीयूष कुमारने सांगितले. साधारण १३ वष्रे जाहिरात आणि विपणन क्षेत्रात काम केल्यावर पीयूषने ही कंपनी सुरू केली आहे. त्याला स्वत:ला खेळ खेळण्यात आणि पाहण्यात रस असल्यामुळे सोहन सिन्हा आणि अक्षत गोएल यांना सोबत घेऊन त्याने या अ‍ॅपची निर्मिती केली.

या अ‍ॅपमध्ये लॉगइन करून क्रीडाचाहत्याने प्रवेश केल्यावर तो खेळांच्या विश्वात रमून जातो. त्याच्या आवडीच्या खेळाविषयी त्याला इत्थंभूत तपशील देण्याची जबाबदारी हे अ‍ॅप पार पाडते. अ‍ॅपमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अ़ावडीचा खेळ कोणता, खेळाडू कोणता याचा तपशील भरावयाचा असतो. तो एकदा भरला की तुम्ही पुढची माहिती मिळण्यास मोकळे होतात. या अ‍ॅपमध्ये सध्या क्रिकेट, फुटबॉल, टेनिस आणि बास्केटबॉल या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. यामध्ये स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यांचे लाइव्ह अपडेट्स दिले जातात. तुम्ही निवडलेल्या खेळाच्या सामन्याच्या अर्धा तास आधी येथे ‘पॅशन स्कोअर’ सांगायचा असतो. म्हणजे आयपीएलचे उदाहरण घ्यायचे झाले तर कोणता संघ किती धावा काढणार आहे याचा अंदाज बांधायचा असतो. यासाठी तुम्हाला चार पर्याय दिलेले असतात, त्यातील एक पर्याय निवडायचा असतो. हा पर्याय निवडल्यावर तुम्ही एका चॅटरूममध्ये जाता. तेथे तो सामना बघणारी हजारो मंडळी असतात. त्या सर्वाशी एकाच वेळी किंवा त्यातील एकाशी वैयक्तिक चॅटवर तुम्ही बोलू शकता. अ‍ॅपची रचना करताना अशी विशेष करण्यात आली आहे की, वापरकर्त्यांला आपण स्टेडियममध्ये बसून सामना पाहतो असा भास होतो. या रूममध्ये प्रवेश करताना तुम्हाला ५० आभासी नाणी दिली जातात. हे कॉइन्स तुम्ही जसे अंदाज बांधतात त्यावर वाढत जातात. या नाण्यांचा वापर करून तुम्ही अ‍ॅमेझॉन किंवा पेटीएमचे कूपन्स मिळवू शकतात. यामध्ये आपण इतर चाहत्यांची गप्पा मारता मारता त्यांच्याशी मैत्रीही करू शकतो. यामुळे हे एक वेगळय़ा प्रकारचे समाजमाध्यमच आहे, असे पीयूषने नमूद केले. यामध्ये केवळ खेळाचे लाइव्ह अपडेट्स दिले जातात असे नाही तर त्यासंबंधीचे लेख, आकडेवारीही दिली जाते. तसेच यामध्ये तुम्ही तुमचा आवडता खेळ खेळूही शकणार आहात. यामुळे या अ‍ॅपमध्ये प्रवेश केलेला एक वापरकर्ता किमान १३ ते १५ मिनिटे रमतो, असे पीयूषने सांगितले.

भविष्यातील वाटचाल

भविष्यात यामध्ये फॉम्युला वनसारख्या अनेक क्रीडा प्रकारांचा समावेश केला जाणार आहे. याचबरोबर व्यवसायवृद्धी केवळ देशातच नव्हे तर परदेशातही करण्याचा आमचा मानस आहे, कारण येथेच बसून परदेशातील क्रीडाचाहत्यांना आम्ही आकर्षित करू शकणार आहोत व त्यांच्यासाठी ही संकल्पना वापरणे फारसे अवघड नसेल. तसेच वापरकर्त्यांला काही तरी चांगले मिळावे या उद्देशाने अ‍ॅप सातत्याने अद्ययावत केले जाणार आहे.

नवउद्यमींना सल्ला

नवउद्यमींना कोणतीही संकल्पना पूर्णपणे बाजारात आणण्यापूर्वी काही हजार लोकांना त्याचा वापर करून ती संकल्पना कशी वाटते याचा अंदाज बांधायचा. त्यांचे विचार लक्षात घ्यायचे. जर त्यांना हे उत्पादन आवडले तरच पुढचा विचार करायचा नाही तर सर्व पैसे आणि मेहनत वाया जाते. याचबरोबर निधी उभा करत असताना एकदम सर्व निधी घेऊ नका. टप्प्याटप्प्याने निधी घ्या व तुमची संकल्पना अधिक विकसित करत जा, असा मोलाचा सल्ला पीयूषने दिला आहे, तर आपली संकल्पना पुढे नेण्यासाठी चांगले भागीदार किंवा सहसंस्थापक व इतर तज्ज्ञ नेमणे हेही आवश्यक असते, कारण चांगल्या चमूशिवाय तुम्ही चांगली सेवा देऊ शकणार नाहीत, असेही पीयूष यांनी स्पष्ट केले.

गुंतवणूक आणि उत्पन्नस्रोत

वर्षभरापूर्वी जेव्हा ही कंपनी सुरू केली तेव्हा नवउद्योगांना निधी उभा करणे हे मोठे आव्हान होते. यामुळे निधी उभारण्याचा आमचा मार्ग खडतर होता; पण चित्रपट अभिनेते बोमन इराणी यांनी आमच्यावर विश्वास दाखविला आणि आमच्या वेगळ्या संकल्पनेचे स्वागत करत निधी उपलब्ध करून दिला. यानंतर आणखी काही लोकांनी निधी उपलब्ध करून दिला. यानंतर नुकताच इंटेक्स या तंत्रज्ञान कंपनीने मोठय़ा प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. तरीही आणखी काही निधी उभा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. याचबरोबर अ‍ॅपमध्ये नियमित जाहिराती न घेता विविध ब्रँड्सच्या जाहिराती घेऊन त्यांच्या त्यांच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. यातून आम्हाला उत्पन्न होणार आहे. याचबरोबर अ‍ॅपवर मिळणाऱ्या पेटीएम किंवा अ‍ॅमेझॉनच्या व्हाऊचर्सवर खरेदी करताना लोक व्हाऊचरच्या किमतीपेक्षा जास्त खरेदी करतात. यामुळे कंपन्यांचा फायदा होतो हे त्यांच्या लक्षात आणून देऊन इतर ब्रँड्सकडून व्हाऊचर्स घेण्याचा आमचा प्रयत्न असेल. याशिवाय अ‍ॅपमधील विविध फीचर्सना प्रायोजक मिळवण्याचाही आमचा प्रयत्न आहे. अशा तीन प्रकारांतून आम्ही उत्पन्न मिळवू शकणार आहोत.

Niraj.pandit@expressindia.com

@nirajcpandit