सचिन तेंडुलकर हा आपल्या सर्वांना क्रिकेटपटू म्हणून परिचित आहे. पण आता सचिनने क्रिकेटच्या मैदानात एक नवी इनिंग सुरु केली आहे. नेरुळ येथील डी.वाय पाटील स्टेडियमवर तेंडुलकर मीडलसेक्स ग्लोबल अकादमीचे गुरुवारी नवी मुंबईत उदघाटन झाले. यावेळी प्रशिक्षक या भूमिकेत दिसलेल्या सचिनने पत्रकारांशी संवाद साधला.

मिडलसेक्स काऊंटी क्लबला १५४ वर्ष झाली आहेत. तर मला २४ वर्षांचा अनुभव आहे. या अनुभवाचा आम्ही या मुलांना फायदा करून देण्याचे ठरवले आहे. क्रिकेटच्या तीनही प्रकारात कशा प्रकारे खेळायचे? याचे प्रशिक्षण येथे देण्यात येईल. मोठमोठया शहरात क्रिकेटचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळते. पण शहराबरोबरच ग्रामीण भागातील मुला-मुलींना प्रशिक्षण मिळण्यासाठी ग्रामीण भागांतदेखील तेंडुलकर मीडलसेक्स ग्लोबल अकादमीच्या रूपाने पाय रोवले जातील, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

ही अकादमी मुलांना व मुलींना चांगले व्यासपीठ मिळवून देणार आहे. येथे प्रशिक्षक म्हणून इंग्लंडचे प्रशिक्षकदेखील मुलांना शिकवणार आहेत. तसेच जी मुले प्रतिभावान आहेत, मात्र त्यांना पैशाअभावी क्रिकेटचे प्रशिक्षण घेता येत नाही, त्यांना मोफत प्रशिक्षण या अकादमीत दिले जात आहे. उत्तम तंत्रज्ञान भारतीय व विदेशी प्रशिक्षकांकडून दिले जाणार असून ग्रामीण भागात चांगले खेळाडू निर्माण करण्यासाठी अकादमी प्रयत्नशील असणार आहे. तिथे अकादमीला किती वाव मिळेल? आजूबाजूचा परिसर कसा असेल? या बाबी लक्षात घेतल्या जातील, असेही त्याने यावेळी सांगितले.

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी, मिलिंद गुंजाळ, प्रदीप सुंदरन, संतोष जेरे हेदेखील येथे मार्गदर्शन करणार आहेत. हा चार दिवसाचा कॅम्प आहे. यातून इंग्लंड व ऑस्ट्रेलिया येथे खेळण्याची मुलांना संधी मिळणार आहे, असेही सचिनने स्पष्ट केले.