पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अग्रक्रम असलेला कौशल्यविकास अभ्यासक्रम शालेय स्तरापासून सुरू करण्यासाठी राज्य सरकारला ‘कौशल्य’ पणाला लावावे लागणार आहे. शालेय तासिका आणि विषयांची संख्या न वाढवता व्यवसाय शिक्षणाचा अभ्यासक्रमात समावेश करावा लागणार असल्याने त्यासाठी हिंदी किंवा संस्कृत या भाषा वगळाव्या लागणार आहेत. तसा प्रस्तावच राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तयार केला आहे.
आगामी शैक्षणिक वर्षांपासून नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी व्यवसाय शिक्षण संचालनालयाने तयार केलेल्या अभ्यासक्रमाला राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मान्यताही दिली आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रात्यक्षिकाच्या आठवडय़ाला आठ तासिका या अतिरिक्तच ठेवाव्या लागणार आहेत. पण विषय शिकविण्यासाठीच्या चार तासिका या सध्याच्या वेळेतच ठेवाव्या लागणार आहेत. सध्या शाळांमध्ये आठवडय़ाला सरासरी ४५ तासिकांनुसार कामकाज चालते. यात आणखी तासिका वाढवण्यास शिक्षकांपासून अनेकांचा विरोध आहे.
सध्या व्यवसाय शिक्षण हा विषय सहा मुख्य विषयांखेरीज अतिरिक्त म्हणून उपलब्ध आहे. मात्र पुढील काळात तो १०० गुणांसाठीचा विषय म्हणून अभ्यासक्रमात आणला जाणार आहे. या पाश्र्वभूमीवर, व्यवसाय शिक्षणाचा समावेश करण्यासाठी एका भाषेचा बळी देण्याचा प्रस्ताव मंडळाने ठेवला आहे. प्रथम मराठी आणि तृतीय भाषा इंग्रजीची सक्ती असल्याने द्वितीय भाषा असलेल्या हिंदूी (पूर्ण), संस्कृत (पूर्ण) किंवा हिंदूी-संस्कृत (संयुक्त) या भाषेचा आग्रह सोडून त्याऐवजी व्यवसाय शिक्षण सुरू करण्याचा विचार आहे. मात्र एक भाषा रद्द केली, तर त्यावर गदारोळ होईल, अशी भीती शिक्षण विभागाला वाटत आहे.
गळती रोखण्यावर उपाय
राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांसाठी ही योजना असून शालेय स्तरावर रोजगाराभिमुख शिक्षणाची जोड दिली जाणार आहे. सध्या मराठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून विद्यार्थ्यांची गळती सुरू आहे. ती रोखण्यासाठीही व्यवसाय शिक्षण एक स्वतंत्र विषय म्हणून सुरू केल्यास त्याचा उपयोग होऊ शकेल. आयटीआयच्या धर्तीवर हे अभ्यासक्रम असतील आणि परिसरातील उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांची निवड केली जाईल.