काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचे खासदार पळवून सेनेला खिंडार पाडण्याचा उद्योग सुरू केल्यानंतर त्यास चोख उत्तर देण्यासाठी शिवसेनेने पश्चिम महाराष्ट्रातच काँग्रेस-राष्ट्रवादीला सळो की पळो करून सोडण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शरद पवार यांचे एकेकाळचे निकटवर्तीय असलेल्या खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे चिरंजीव संजय मंडलिक यांना आज शिवसेनेत प्रवेश देण्यात आला.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर प्रा. संजय मंडलिक यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेत सेनेत प्रवेश केला. शिवसेनेने शुक्रवारी राज्यातील पंधरा मतदारसंघातील सेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर करताना कोल्हापूरमधील उमेदवाराचे नाव जाहीर केले नव्हते.
राज्याच्या शहरी भागात सेना-भाजपचे वर्चस्व असले तरी ग्रमीण व त्यातही पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे असलेले बस्तान मोडण्यावर सेना-भाजपच्या निवडणूक रणनीतीचा भर आहे. त्यामुळेच स्वाभिमान शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांना महायुतीत सामील करण्यात आले. यामुळे हातकणंगले, माढासह पश्चिम महाराष्ट्रात आघाडीला त्रस्त करण्यात यश येणार आहे. आता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातही राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांना टक्कर देण्यासाठी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे चिरंजीव प्रा. संजय मंडलिक यांना उमेदवारी देण्याची शिवसेनेची रणनीती आहे.
मातोश्रीवर आज खासदार राजू शेट्टी, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत मंडलिक यांनी शिवसेनेत प्रवेश केला. कोल्हापूरमधून निष्ठावंतांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी शिवसैनिकांची आहे. मात्र निवडून येण्याची शक्यता या निकषावर मंडलिक यांना उमेदवारी मिळेल असे सूत्रांचे म्हणणे आहे.
माढय़ाचा तिढा सुटला
माढाचा तिढा सुटला असून भाजपच्या वाटय़ाची ही लोकसभेची जागा स्वाभिमान शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांना देण्यात आली तर जानकर यांना बारामतीमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.