प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन अनेकांचे आधारवड बनलेले ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर समाजाशी एकरुप झाले होते. समाजाची सुख-दु:ख समजून घेऊन त्यांनी काम केले. सामाजिकीकरण आणि सामाजिकता त्यांच्या स्वभावाचा एक भाग बनला होता. त्यामुळेच त्यांचे मंडळीकरण झाले होते, असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी काढले.
मराठी व्यावसायिक उद्योजक मंडळ, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती आणि सारस्वत बँक यांच्या संयुक्त विद्यमाने दादरच्या राजा शिवाजी विद्यालयातील बी. एन. वैद्य सभागृहात रविवारी ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन साळगावकर कोकणातून मुंबईत आले. सचोटी, प्रामाणिकपणा, प्रज्ञा, प्रतिभेतून त्यांची जडणघडण होत गेली आणि प्रत्येकाचा विचार करणारे साळगावकर समाजाचे आधारस्तंभ बनले, असे सांगून कर्णिक यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ज्योतिर्भास्कर परंपरेतून मोठे झाले होते, पण ते परंपरेला चिकटून राहिले नाहीत. प्रगती साधायची असेल तर सुधारणा करायलाच हव्यात असे उदारमतवादी व्यक्तीमत्त्व होते, असे सांगून ज्येष्ठ पत्रकार डॉ. अरुण टिकेकर यांनी ‘लोकसत्ता’ आणि साळगावकर यांच्या ऋणानुबंधातील जुन्या आठवणींना वाट मोकळी करून दिली.
सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर म्हणाले की, जयंतराव डोळस होते. समस्यांचे आकलन आणि त्यावर उपाय सुचवून अनेकांना त्यांनी मोलाची मदत केली. जयंतरावांच्या स्मृती जागरुत ठेवण्यासाठी सारस्वत बँकेतर्फे सिंधुदुर्गमध्ये भव्य समाजकल्याण मंदिर उभारण्यात येणार असून त्याल जयंतरावांचे नाव देण्यात येणार आहे. या शिवाय बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबावकर, जीवन विद्या मिशनचे विश्वस्त प्रल्हाद पै, व्यापारी मित्र मंडळाचे किशोर रांगणेकर, साहित्य संघाचे डॉ. रा. अ. भालेराव, उद्योजिका अचला जोशी, मोखाडा सुंदर गणेश न्यासचे विश्वस्त विनय सहस्रबुद्धे, चित्रपट दिग्दर्शक विनय आपटे, ज्येष्ठ साहित्यिक रामदास भटकळ आदींनी साळगावकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. जयंतरावांचे कुटुंबियही यावेळी उपस्थित होते