हिट अँड रन प्रकरणी गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर अभिनेता सलमान खान काहीसा भावूक झालेला दिसला. या प्रकरणाची सुनावणी सुरू असलेल्या ४३ क्रमांकाच्या कोर्टरूममध्ये दुपारी दीड वाजता सलमान खान आला. त्यावेळी सलमानला पाहण्यासाठी कोर्टरूमच्या परिसरात वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि बघ्यांची एकच गर्दी झाली होती. गुरुवारी सकाळी न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यावर न्यायालयाने सलमान खानला न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी सलमान कर्जतमधील एनडी स्टुडिओत ‘सुलतान’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र होता. परंतु, न्यायलयाच्या आदेशानंतर तो मुंबईकडे येण्यास निघाला. सलमानचे वकील अमित देसाई यांनी सांगितल्याप्रमाणे दुपारी दीड वाजता सलमान न्यायालयात आला. यावेळी सलमानची बहीण अलविरा, मेव्हणा आयुष शर्मा आणि त्याची मॅनेजर रेशमा शेट्टी कोर्टरूममध्ये उपस्थित होते. सलमान खान निकाल ऐकण्यासाठी उभा राहिला आणि न्यायमूर्तींनी त्याची निर्दोष मुक्तता झाल्याचे जाहीर केले. त्यावेळी भावूक झालेल्या सलमानचे डोळे पाणावलेले दिसत होते. हा निकाल ऐकल्यानंतर अलविरा आणि रेशमा शेट्टी यांनीही एकमेकांना आनंदाने मिठ्या मारल्या.
मात्र, या निकालानंतर सलमान कागदपत्रांची पूर्तता करत असताना लोक खुर्च्यांवर आणि न्यायाधीशांच्या आसनाच्याठिकाणी उभे राहून सलमानला पाहण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे कोर्टरूमच्या परिसरात गोंधळ निर्माण झाला होता.