10 December 2018

News Flash

हृदयनाथ मंगेशकर, शांता गोखले, प्रदीप मुळ्ये, शफाअत खान मानकरी

संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार जाहीर

संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार जाहीर

केंद्र शासनाचे २०१५ या वर्षांसाठीचे ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, लेखिका व समीक्षिका शांता गोखले, नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये, नाटककार शफाअत खान आणि लावणी नृत्यांगना छाया व माया खुटेगावकर आदींचा समावेश आहे.

संगीत नाटक अकादमीच्या कार्यकारिणीच्या आगरतळा येथे झालेल्या बैठकीत या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. संगीत, नाटक, नृत्य आदी विविध विभागांसाठी हे पुरस्कार आणि शिष्यवृत्ती दिली जाते. पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी १ लाख रुपये आणि ताम्रपट तर शिष्यवृत्तीचे स्वरूप प्रत्येकी तीन लाख रुपये असे आहे.

पं. हृदयनाथ मंगेशकर (सुगम संगीत), प्रदीप मुळ्ये (नेपथ्य), छाया-माया खुटेगावकर (लावणी नृत्य), शफाअत खान (नाटय़ लेखन), शांता गोखले (परफॉर्मिग आर्ट-नाटय़विषयक लेखन आणि समीक्षा यातील महत्त्वपूर्ण योगदान) यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.

संगीत नाटक अकादमीच्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी माझी निवड झाली याचा मनापासून आनंद आहे.

शांता गोखले, ज्येष्ठ लेखिका

 

मराठी नाटककाराच्या लेखनाची दखल दीर्घ कालावधीनंतर राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली, याचा खूप-खूप आनंद आहे. पुरस्कारामुळे आता संपूर्ण देशाचे लक्ष पुन्हा एकदा मराठी रंगभूमीकडे जाईल असा विश्वास वाटतो.

– शफाअत खान, ज्येष्ठ नाटककार

 

नेपथ्यासाठी हा पुरस्कार मला मिळाला त्याचा आनंद आहे. या निमित्ताने बॅकस्टेज आर्टिस्टच्या कामाची व त्यांच्या योगदानाची दखल घेतली गेली असे वाटते आणि बॅकस्टेज आर्टिस्टसाठी ती महत्त्वाची बाब आहे.

– प्रदीप मुळये, ज्येष्ठ नेपथ्यकार

 

 

First Published on April 25, 2016 2:15 am

Web Title: sangeet natak academy awards announced