News Flash

महिलेच्या छळाचे आरोप संजय राऊत यांना अमान्य

या महिलेने छळवणूक, पाळत ठेवणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे इत्यादी आरोपांप्रकरणी तीन वेळा तक्रार केली आहे.

संग्रहीत

शिवसेना खासदार संजय राऊत आपली विविध प्रकारे छळवणूक करीत असल्याचा आणि पोलिसांत तक्रार करूनही काहीच कारवाई केली जात नसल्याचा आरोप करणारी याचिका एका महिलेने उच्च न्यायालयात केली आहे. राऊत यांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी त्यांच्यावरील आरोपांचे खंडन केले. न्यायालयाने मात्र याचिकाकर्ती आणि राऊत यांना न्यायालयात आरोप-प्रत्यारोप न करण्याची सूचना केली.

‘ही महिला आपल्याला मुलीसारखी आहे. तिच्या कुटुंबाशी आपल्या कुटुंबाचे स्नेहाचे संबंध आहेत. पतीसोबत तिचा वाद सुरू आहे. या प्रकरणात आपण तिच्या पतीची बाजू घेत असल्याच्या समजातून ती आपल्यावर हे आरोप करत आहे,’ असा दावा राऊत यांच्यावतीने अ‍ॅड्. प्रसाद ढाकेफाळकर यांनी केला.  तर, मुलगी असणे आणि मुलीसारखे असणे यात फरक आहे, असे सांगत या महिलेने राऊत यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणी केली.

या महिलेने छळवणूक, पाळत ठेवणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे इत्यादी आरोपांप्रकरणी तीन वेळा तक्रार केली आहे. तिने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तीन वेळा गुन्हा दाखल केला आहे. त्यातील पहिल्या गुन्ह्यत आरोपपत्र दाखल झाले आहे, दुसऱ्या प्रकरणात पोलिसांनी पुरावे नसल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. मात्र यातील एकाही गुन्ह्यत राऊत यांच्या नावाचा समावेश नाही.

न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने या प्रकरणी कोणतेही आदेश देण्यास नकार दिला. मात्र आपण या महिलेचे म्हणणे ऐकणार आहोत, असे स्पष्ट करत तिला पहिल्या गुन्ह्यत दाखल केलेल्या आरोपपत्राची प्रत उपलब्ध करावी, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2021 12:23 am

Web Title: sanjay raut denied allegations of harassment of women abn 97
Next Stories
1 राज्यात नागपूरमध्ये सर्वाधिक रुग्ण
2 गुन्हा रद्द करण्यासाठी शर्जिल उस्मानीची उच्च न्यायालयात धाव
3 ‘पुणे येथील तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाला अवाजवी प्रसिद्धी नको’
Just Now!
X