किती नेते व नोकरशहा अडकले?  संजय राऊत यांचा सवाल

काळा पैसा खणून काढण्यासाठी नोटाबंदीच्या घेतलेल्या निर्णयामुळे किती राजकीय नेते व नोकरशहा अडकले, असा सवाल करीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. हा निर्णय म्हणजे आर्थिक अराजक असल्याची टीका त्यांनी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नोटाबंदीमुळे जनतेला त्रास होत असल्याने सातत्याने विरोध केला असून त्याची धार आता अधिकच वाढणार आहे. सरकारमध्ये शिवसेना सहभागी असली तरी या निर्णयास शिवसेनेने कडाडून विरोध करून  मोदी यांच्यावरच टीकास्त्र सोडले आहे.

नोटाबंदीनंतर प्राप्तिकर विभाग, अंमलबजावणी संचालनालय, पोलीस आदींनी अनेक ठिकाणी धाडी टाकून जुन्या व नव्या नोटा जप्त केल्या. मात्र त्यात किती राजकारणी व नोकरशहा अडकले, असा प्रश्न आता राऊत यांनी उपस्थित केला आहे. राजकारणी व नोकरशहांकडे काळ्या पैशांचे प्रमाण मोठे असताना त्यांच्यापैकी कोणीही धाडसत्रामध्ये सापडत नाही आणि जनतेचे मात्र हाल होत आहेत याकडे राऊत यांनी लक्ष वेधले.

त्र्यंबकेश्वरमध्ये मंदिरांच्या पुजाऱ्यांच्या घरांवर प्राप्तिकर विभागाने धाडी घातल्या. पण हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर असताना मुस्लीम, ख्रिश्चन धर्मगुरू यांची संपत्ती आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांबाबत सरकार तपासणी करणार का, असा मुद्दाही राऊत यांनी उपस्थित केला आहे.