मुंबईत सध्या मुसळधार पाऊस सुरु असून गणेशोत्सवाचीही धामधूम आहे. या काळात शहरातील चौकाचौकात सार्वजनिक गणेश मंडळांचे मंडप टाकलेले आहेत. मात्र, पावसामुळे मंडपात पाणी शिरले असेल तर संभाव्य दुर्घटना घडू नये यासाठी सर्व गणेश मंडळांनी आपले वीज कनेक्शन तत्काळ बंद करावेत अशा सुचना सार्वजनिक गणेशोत्सव समितीकडून देण्यात आल्या आहेत.


मुंबईत २४ तासांत १५ सेमी पाऊस झाला असून अजूनही मुसळधार पाऊस सुरु असल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील लोकल सेवा कोलमडली असून रेल्वे उशीराने धावत आहेत. जोरदार पाऊस थांबण्याचा शक्यता नसल्याने शाळांसह अनेक चाकरमान्यांना त्यांच्या कार्यालयांकडून आज सुटीही देण्यात आली आहे. मात्र, घरी जाण्यासाठी त्यांनी लोकल, बस वेळेवर मिळण्यास अडचणी येत आहेत.

या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांना पाण्याचा निचरा होईपर्यंत वीज कनेक्शन बंद ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. गणेश मंडळांचे मंडप हे लोखंडी पत्र्यांची शेड असतात. त्यातच अख्ख्यी तुंबल्याने अनेक सखल भागातील गणेश मंडळांच्या मंडपांमध्येही पाणी शिरले आहे. अशा परिस्थितीत चुकून वीजप्रवाहाचा पाण्याशी संपर्क झाल्यास मोठा अनर्थ ओढवू शकतो त्यामुळे उत्सव काळात विपरीत घटना घडू नये यासाठी शहरातील सर्व गणेश मंडळांना काळजी घेण्याचे आवाहनही सार्वजनिक गणेशोत्सव समितीकडून करण्यात आले आहे.