अमित शहा तीन दिवस मुंबईत

भाजप अध्यक्ष अमित शहा १६ ते १८ जून या दरम्यान मुंबईत येत असून भाजप आमदार, खासदार व मंत्र्यांची झाडाझडती घेणार आहेत. प्रत्येकाच्या कामाचा आढावा घेण्यात येणार असून समाधानकारक काम नसलेल्या काही मंत्र्यांवर पुढील काळात कारवाईही होण्याची शक्यता आहे.

शहा हे देशभरातील अनेक राज्यांमध्ये दौऱ्यावर असून ते तीन दिवस मुंबईत येत आहेत. त्यांचे १६ जूनला आगमन होणार असून त्यादिवशी ते भाजप आमदार, पदाधिकारी यांच्याशी गरवारे क्लबमध्ये चर्चा करतील. त्यानंतर राज्यातील भाजप खासदारांची बैठक १७ जूनला सह्य़ाद्री अतिथीगृहावर आयोजित करण्यात आली आहे. तर भाजप मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी १८ जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षां’ निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवसेना सत्तेत सहभागी असूनही विरोधकांहूनही अधिक भाजपला त्रास देत आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांचा विचार भाजप करीत आहे. या पाश्र्वभूमीवर शहा यांच्या दौऱ्याला महत्व आहे. निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनेही संघटनात्मक बाबींचा आढावा शहा घेणार आहेत.