राज्याचे ४० वे पोलीस महासंचालक म्हणून सतीश माथूर यांनी रविवारी पदभार स्वीकारला. मावळते महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी पदाची सूत्रे त्यांच्या हाती सोपवली. त्यापूर्वी दीक्षित यांना मुंबई पोलिसांकडून नायगाव येथे निरोप देण्यात आला. त्या वेळी मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर आणि दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक म्हणून काम पाहताना अधिकाधिक पारदर्शक कारभार करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या प्रवीण दीक्षित यांची ३० सप्टेंबर २०१५ रोजी राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती झाली. त्यांच्या कारकीर्दीत महिला सुरक्षेसाठी ‘प्रतिसाद’, सामान्य नागरिकांनी पोलीस मित्र बनावे म्हणून ‘पोलीस मित्र’ अ‍ॅप सुरू करण्यात आले. तसेच विनयभंग, छेडछाडसारख्या घटनांमध्ये २४ तासांच्या आत आरोपपत्र दाखल करण्याचे महत्त्वपूर्ण आदेशही दीक्षित यांनी दिले होते. महासंचालकपदी १० महिने राहिल्यानंतर रविवारी दीक्षित निवृत्त झाले. त्यांना निरोप देण्यासाठी मुंबई पोलीस मुख्यालय नायगाव येथे निरोप समारंभाचे सकाळी ९ वाजता आयोजन केले होते. पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. निरोप समारंभानंतर दीक्षित यांनी राज्य पोलीस मुख्यालयात माथूर यांची भेट घेत महासंचालक पदाची सूत्रे त्यांच्या हाती सोपवली.