मैदानात खेळण्या-बागडण्याच्या, मस्ती करण्याच्या आणि शाळेत जाऊन पुस्तकांचे नवीन जग अनुभवण्याच्या काळात उपचारांसाठी अनेक महिने रुग्णालयात राहावे लागणाऱ्या मुलांसाठी टाटा स्मारक रुग्णालयाकडून नवीन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या तसेच बाह्य़ रुग्ण कक्षात सातत्याने उपचार सुरू असलेल्या मुलांना पुस्तकाची गोडी लावण्यासाठी टाटामधील इम्पॅक्ट फाउंडेशनच्या सहकार्याने ‘शाळा’ सुरू झाली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या या शाळेत १०० नियमित विद्यार्थी आहेत.
टाटा रुग्णालयात दरवर्षी कर्करोगावरील उपचारांसाठी सरासरी दोन हजार मुले येतात. यातील ७० टक्के मुले आर्थिकदृष्टय़ा कमकुवत गटातील असतात. या मुलांना उपचारांसाठी रुग्णालयात सहा ते आठ महिने राहावे लागते आणि त्यामुळे त्यांची शाळा सुटते. उपचारांमुळे ही मुले बरी झाली तरी त्यातील ५० टक्के मुले पुन्हा शाळेत जात नाहीत. इतरांना संसर्ग होण्याची अनाठायी भीती किंवा मुलांचे संरक्षण करण्याची भावना यामुळे अभ्यास मागे पडतो. मात्र उपचारांनंतर पुन्हा शाळेत गेलेल्या मुलांना स्वीकारले जाते व ही मुले भविष्यात उत्तम कामगिरी करतात असे दिसून आले आहे. टाटामधून उपचार घेतलेली अनेक मुले आता डॉक्टर, अभियंता, तसेच विविध क्षेत्रांत पुढे गेली आहेत. सर्वच मुलांना भवितव्य घडवण्याची संधी मिळावी, मुलांना अभ्यासापासून दूर गेल्यासारखे वाटू नये यासाठी टाटा स्मारक रुग्णालयात पाच महिन्यांपूर्वी शालेय अभ्यासक्रम शिकवण्याची मोहीम हाती घेण्यात आली. बाह्य़ रुग्ण तसेच आंतररुग्ण कक्षात प्रत्येकी पाच शिक्षक दररोज दोन तास मुलांना शिकवतात. वयानुसार मुलांना वेगवेगळ्या गटात विभागले जाते. यात इंग्रजी, गणित, भूगोल, सामान्य ज्ञान, कला, साहित्य असे विषय अभ्यासले जातात. या वर्गात दर दिवशी १०० विद्यार्थी असतात. पूर्ण वेळ शिकण्याची इच्छा असलेल्या मुलांना कॅन्शाळा या पालिकेच्या शाळेत प्रवेश दिला जातो.
रुग्णालयात शिक्षण देण्याचा उपक्रम पाश्चिमात्य देशात सुरू असला तरी भारतातील हा या प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. टाटाच्याच बालरुग्ण कक्षामधून स्थापन करण्यात आलेल्या इम्पॅक्ट फाउंडेशनकडून सुरू झालेल्या या उपक्रमातून उत्तम पिढी घडवण्याचे काम सुरू आहे. मुलांना व पालकांना समुपदेशन करण्यापासून उपचारांचा सुरुवातीचा खर्च, सकस आहाराचा पुरवठा, राहण्याची व्यवस्था यासोबत वैद्यकीय, निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्चही संस्थेकडून केला जातो. २००८ मध्ये उपचार अर्धवट सोडलेल्या मुलांची संख्या २५ टक्के होती. या संस्थेच्या प्रयत्नांमुळे गेली चार वर्षे ९५ टक्क्य़ांहून अधिक बालकांना पूर्ण उपचार मिळतात.