मुंबई : दहावीतल्या विद्यार्थ्यांला बेदम मारहाण, लैंगिक छळ केल्याच्या आरोपात मुलुंड पोलिसांनी येथील शाळेच्या विश्वस्ताला अटक केली. काही महिन्यांपूर्वी विश्वस्ताबाबत समाजमाध्यमांवरून सर्वदूर पसरलेले मिम या प्रकरणाच्या मुळाशी असल्याचा दावा विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी वर्गशिक्षिकेने विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत जाण्याची सूचना केली. तेव्हा वर्गाबाहेर पडलेल्या तक्रारदार विद्यार्थ्यांला शाळेचे विश्वस्त जेरी जोसेफ यांनी अचानक पाठीत लाथ घालत जमिनीवर लोळवले. मिम तयार करण्यात तुझाही सहभाग होता ना? असा प्रश्न वारंवार विचारत जेरी यांनी त्याला शाळेच्या व्हरांडय़ातच बेदम मारहाण सुरू केली. या प्रसंगामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि अन्य कर्मचारी तेथे जमा झाले. ते पाहून जेरी यांनी या विद्यार्थ्यांला स्वत:च्या कार्यालयात नेले. तेथे शिवीगाळ करत बराच काळ त्यांनी विद्यार्थ्यांला मारहाण केली, तसेच त्याचा लैंगिक छळही केला, असा दावा विद्यार्थ्यांने केल्याचे पोलिसांनी सांगितले.

काही महिन्यांपूर्वी जेरी यांच्याबाबतचे आक्षेपार्ह मिम समाजमाध्यमांवरून सर्वदूर पसरले होते. त्यानंतर शाळेने सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून घेतले, त्यांचे मोबाइल तपासले. पुढे या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली गेली.

हे मिम तयार करणारा, पसरवणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव पोलिसांना समजले. या प्रकरणात माझ्या मुलाचा दूरान्वयेही संबंध नव्हता. तरीही जेरी अन्य विद्यार्थ्यांप्रमाणे माझ्या मुलावरही संशय घेत होते. मारहाणीदरम्यान त्यांनी स्पष्टपणे मिमबाबत उल्लेख केला होता. माझ्या मुलाने त्यांना या प्रकरणात सहभाग नसल्याचे वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र जेरी काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते, असा आरोप विद्यार्थ्यांच्या वडिलांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.

सोमवारी दुपारी विद्यार्थ्यांची आई बोनाफाइड प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शाळेत उपस्थित होती. त्या शाळेत आल्याची माहिती मिळताच जेरी यांनी मारहाण थांबवली. संधी मिळताच विद्यार्थी जीव मुठीत धरून शाळेतून बाहेर पडला, रिक्षा करून घरी आला. घर बंद असल्याने तो मामाच्या घरी आला. मामाला त्याने घडला सर्व प्रकार सांगितला. त्याने विद्यार्थ्यांच्या आईला याबाबत सांगितले. तेव्हा विद्यार्थ्यांची आई शाळेतच उपस्थित होती. आई काही प्रमाणपत्रे घेण्यासाठी शाळेत गेली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. शाळेतून बाहेर पडताना मुलाचा अपघात झाला असता तर? असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या पालकांनी विचारला.

पालकांनी केलेल्या आरोपानुसार जेरी विश्वस्त असले तरी ते शिक्षक नाहीत. त्यामुळे शाळेतील दैनंदिन कामकाजाशी त्यांचा काहीही संबंध नाही. मात्र ‘हाफ पॅन्ट’ परिधान केलेले जेरी शाळेत वावरताना हमखास दिसतात. मिम प्रकरणानंतर आणि त्याआधीही त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याचे प्रसंग ऐकिवात आहेत, असेही विद्यार्थ्यांच्या वडिलांनी सांगितले.

सोमवारी संध्याकाळीच पालकांनी मुलुंड पोलीस ठाण्यात जेरी यांच्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी पॉक्सो आणि भारतीय दंड संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून जेरी यांना अटक केली. जेरी यांच्याविरोधात पालकांनी केलेल्या दाव्यांमधील तथ्यता पडताळून पाहात आहोत, असे मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवी सरदेसाई यांनी सांगितले.